पुणे : देशभरात आज ‘मदर्स डे’ साजरा केला जात असतानाच दुसरीकडे पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुरंदर तालुक्यातील निरा गावातील दवाखान्यात बेकायदेशीर गर्भपाताची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टरसह गर्भवती महिला आणि एजंटविरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ संग्रामआप्पा यम्पल्ले यांनी जेजुरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास राज्याच्या कुटुंब कल्याण कार्यालयाकडून गोपनीय ईमेल आला होता. त्यामध्ये पुरंदर तालुक्यातील पिसुर्डी या गावांमध्ये बरकडे नावाचा एजंट असून तो निरा गावातील डॉ सचिन रणवरे यांच्या श्रीराम हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीररित्या गर्भपात करत असल्याची माहिती दिली होती. दरम्यान 14 मे रोजी डॉक्टर सचिन रणवरे हा एका गर्भवती महिलेचा गर्भपात करणार असल्याची माहिती देखील या ई-मेलवर आली होती. या महिलेला पहिली मुलगी असून बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान केल्यानंतर नीरा येथील बारामती रस्त्यावरील श्रीराम हॉस्पिटलमध्ये डॉ. रणवरे हा तिचा गर्भपात करणार असल्याची माहिती मिळाली होती.
रुग्णालयात जाऊन केली पाहणी
त्यानुसार डॉक्टर यम्पल्ले हे विधी सल्लागार अॅड. मेघा सतीश सोनतळे यांच्यासह श्रीराम हॉस्पिटल येथे पोहोचले. या ठिकाणी दवाखान्यात गेल्यानंतर डॉ. सचिन रणवरे यांचे वडील राम रणवरे या ठिकाणी होते. त्यांना डॉक्टर यम्पल्ले यांनी आपली ओळख सांगितली व त्यानंतर दवाखान्याची तपासणी केली. त्यावेळी संबंधित महिलेचा गर्भपात केल्याची माहिती मिळाली. हा गर्भपात डॉ. सचिन रणवरे याने केला असून त्यासाठी बरकडे नावाच्या एजंटने गर्भलिंग निदान केले असल्याची माहिती देखील मिळाली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.