पुणे : राज्यातील अनेक महानगर पालिकांची मुदत संपून वर्षभरापेक्षा अधिक काळ लोटला आहे. अनेक महापालिकांवर वर्षभरापेक्षा अधिक काळापासून प्रशासकराज आहे. महापालिकेच्या निवडणुका नक्की कधी होणार? याची प्रतीक्षा सर्वंक्षीय इच्छूक उमेदवारांना लागली आहे. यावरच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे. फडणवीसांच्या वक्तव्यानंतर महापालिका निवडणूका नक्की कधी होणार? याच्या नव्या तारखा समोर आल्या आहेत.
राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुका या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात असं महत्त्वपूर्ण वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. हा प्रश्न सध्या न्यायालयात असल्याने देवेंद्र फडणीसांनी केलेल्या या वक्तव्यावरुन राज्य शासनाची भूमिकाही काहीशी स्पष्ट होत असल्याचे दिसून येतेयं.
23 महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर
महाराष्ट्रातील 23 महापालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबल्या आहेत. महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये प्रशासकांतर्फे कारभार सुरु आहे. मुंबईत मार्च 2022 पासून प्रशासक कारभार पाहत आहेत. सुरुवातीला करोना महामारी, ओबीसी आरक्षणामुळं निवडणुका लांबल्या होत्या. त्यानंतर वार्ड फेररचनेच्या प्रकरणामुळं निवडणुका लांबल्या आहेत. मुंबई हायकोर्टानं मुंबईतील वॉर्डची संख्या 236 वरुन 227 ठेवण्याच्या निर्णयाला वैध ठरवल्यानं त्यानंतर ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाची प्रकरणं देखील सुप्रीम कोर्टात आहेत.