भुसावळ: भुसावळ शहरात तापमानाचा पारा ४७ अंशावर गेला आहे. त्यामुळे उन्हाचे चटके जाणवू लागले आहे. वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भुसावळ शहरात रेल्वे कर्मचाऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.
भुसावळ शहरातील रेल्वे कर्मचारी गिरीश शालिग्राम पाटील (वय २८) यांना आज सकाळी उलट्या होऊ लागल्याने व पोटात दुखत असल्याने डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी औषधी देऊन त्याला घरी पाठवले, मात्र उलट्या न थांबल्यामुळे डॉ. राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना दुपारी २ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी डॉ. मानवतकर यांनी बाजारपेठ पोलिसात माहिती दिली आहे. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गिरीश हा शालिक मिठाराम पाटील यांचा लहान मुलगा आहे.
उष्माघातापासून सुरक्षेसाठी अशी घ्या काळजी
* तहान नसल्यासही पुरेसे पाणी प्या.
* सौम्य रंगाचे, सैल आणि कॉटनचे कपडे वापरा.
* बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरा.
* प्रवास करताना सोबत पाण्याची बॉटल घ्यायला विसरू नका.
* आपलं घरं थंड ठेवा, पडदे लावा, सनशेड बसवा आणि शक्य असल्यास रात्री खिडक्या उघड्या ठेवा.
* उन्हात डोक्यावर छत्री, टोपीचा वापर करा. डोके, गळा, चेहºयासाठी ओल्या कपड्याचा वापर करा.
* अशक्तपणा, कमजोरपणा जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
* ओआरएस, घरातील लस्सी, तोरणी, लिंबू पाणी किंवा ताक इत्यादी प्या.
* थंड पाण्याने आंघोळ करा.
* दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान उन्हात फिरू नका.
* मद्यसेवन, चहा, कॉफी आणि काबोर्नेटेड सॉफ ड्रिंक्स पिणं टाळा, त्यामुळे डिहायड्रेशन होतं.
* उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळं अन्न खाऊ नका.