मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे वादात सापडले आहेत. सीबीआयने समीर वानखेडे यांच्यासह एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. ड्रग्ज प्रकरणातील वानखेडे टीम अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या प्रकरणात 25 कोटी रुपये वसुलीचा कट आखल्याचे एफआयआरमधून समोर आले आहे. अशा परिस्थितीत समीर वानखेडे ड्रग्ज पकडण्याच्या नावाखाली खंडणीचे रॅकेट चालवत होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एनसीबीच्या व्हिजिलेंस तपासात वानखेडेबाबत अनेक मोठे खुलासे झाले आहेत, तसेच क्रूझवर छापेमारीचा संपूर्ण कट कसा रचला गेला आणि 25 कोटी रुपये वसूल करण्याचे नियोजन करण्यात आले हेही समोर आले आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर एनसीबीने समीर वानखेडेसह काही अधिकाऱ्यांची दक्षता चौकशी सुरू केली होती. एनसीबीच्या या व्हिजिलेंस अहवालाच्या आधारे सीबीआयने समीर वानखेडे यांच्यासह एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. एनसीबीच्या व्हिजिलेंस पथकातील महत्त्वाची व्यक्ती सॅमविल डिसोझा याने वानखेडेबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत. डिसोझा हा ड्रग्ज सप्लायर होता. समीर वानखेडे यांच्या एनसीबीच्या पथकाने एलएसडी ड्रग्जच्या गुन्ह्यात त्याला पकडले. त्यादरम्यान समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकातील एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांनीही 10 लाखांची लाच घेतल्याचा दावा केला जात आहे. नंतर डिसोझा समीर वानखेडेचा इन्फॉर्मर बनून तो शिकार शोधू लागला. इतकेच नाही तर एनसीबीच्या या पथकाने बनावट ड्रग्जच्या प्लांटमध्ये डिसोझाचा वापर केल्याचा आरोप आहे.
अशी झाली प्लानिंग
समीर वानखेडे यांना गुजरातमधील पाटील नावाच्या व्यक्तीने क्रूझवर होणाऱ्या पार्टीची माहिती दिली होती. त्यात ड्रग्ज पार्टीही होणार असल्याचे सांगण्यात आले. एनसीबीने क्रूझवर छापा टाकण्याची योजना आखली तेव्हा डिसोझाने भानुशाली आणि किरण गोसावी हे वानखेडे आणि एनसीबीचे अधिकारी व्हीव्ही सिंग यांना भेटले. एनसीबीने भानुशाली आणि किरण गोसावी यांना क्रूझवर मोठा हात मारण्याची जबाबदारी दिली. एनसीबीने आपल्या टार्गेटमध्ये 27 जणांची यादी तयार केली होती. मात्र समीर वानखेडेला आर्यन खानबद्दल माहिती मिळताच ही यादी लहान करण्यात आली. या यादीत केवळ 10 नावांचा समावेश करण्यात आला.
सर्वांना सोडून फक्त आर्यनला केले टार्गेट
आर्यन क्रूझवर आला, तो पकडला गेला, त्याचा फोन NCB ने ताब्यात घेतला जेणेकरून त्याला त्याच्या घरी फोन करता येणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानसोबत त्याचे इतर चार मित्रही क्रूझमध्ये होते. मात्र अरबाजच चरससह सापडला, त्याला पकडण्यात आले. आर्यनच्या इतर तीन मित्रांकडून ड्रग चॅट्सही जप्त करण्यात आल्या होत्या, पण त्यांना सोडून फक्त आर्यन खानला टार्गेट करण्यात आले. अरबाजने त्याच्या पहिल्या जवाबातही स्पष्टपणे सांगितले होते की, आर्यनकडे ड्रग्ज नव्हते किंवा त्याने ड्रग्ज घेतलेले नव्हते आणि त्याने आम्हाला नकारही दिला होता. नंतर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली आर्यन खानच्या कुटुंबाकडून वसुलीची योजना आखली गेली.
25 कोटीची मागणी करुन 18 कोटीत सौदा ठरला
आर्यन खान एनसीबीच्या ताब्यात असल्याचे शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीला कळाले. यानंतर ती गोसावीला भेटण्यास तयार झाली. आर्यनला सोडण्यासाठी 25 कोटींची मागणी करण्यात आली होती पण नंतर हे प्रकरण 18 कोटींवर मिटले. पूजा ददलानी आणि किरण गोसावी यांची 2-3 मे रोजी रात्री भेट झाली आणि पूजाने गोसावी यांना 50 लाख रोख दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी किरणचा आर्यन खानसोबतचा सेल्फी व्हायरल झाला आणि किरण हा एनसीबीचा अधिकारी नसल्याचे उघड झाले, ही माहिती पूजा ददलानीपर्यंतही पोहोचली आणि त्यामुळे करोडोंचा सौदा अडचणीत आला.
दक्षता पथकाने पुरावे गोळा केले
आर्यन खानसोबत किरण गोसावी एनसीबीच्या कार्यालयात दिसला तेव्हा एनसीबी कार्यालयाचे सर्व सीसीटीव्ही काम करत होते. मात्र या प्रकरणात दक्षता पथकाकडून तपास सुरू झाल्यावर सीसीटीव्हीसोबत छेडछाड करण्यात आली. डीव्हीआरही वेगळे करण्यात आले. दक्षता पथकाच्या तपासचक्रात अडकलेल्या अधिकाऱ्यांनी आपल्या फोनमधील सर्व डेटा नाहिसा केला. जेणेकरून दक्षता पथकाला पुरावे मिळू नये. मात्र फॉरेन्सिक पद्धतीने सर्व पुरावे पुन्हा मिळवण्यात आले. दक्षता पथकाने त्यांच्या तपासात 2 डझनहून अधिक घटनांचे सीसीटीव्ही फुटेज, डिलीट केलेले चॅट पुन्हा मिळवले.