पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढला आहे. त्यामुळे उकाडा वाढला असून, अंगाची लाहीलाही होत आहे. अशात आता मान्सूनबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. यावर्षी मान्सून जरासा उशिराने दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अंदमानमध्ये मान्सून उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चितेंत भर पडली आहे.
स्कायमेटच्या ताज्या अंदाजानुसार उत्तर भारतात 18 मे नंतर गडगडाट व वादळे सुरू होतील. या वर्षी जूनपर्यंत गरम हवामान कायम राहील. मान्सूनची सुरुवात कमी आणि विलंबाने होणार असल्याचे दिसत असल्याचे म्हटले आहे. स्कायमेटचे संस्थापक-संचालक जतिन सिंग यांनी 15 दिवसांच्या पावसाच्या अंदाजावर एक ट्विट केले आहे. यामध्ये खरीप पिकांच्या पेरणीलाही उशीर होण्याची शक्यता आहे, असे म्हटले आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे.
महाराष्ट्रात कधी येणार मान्सून?
देशात 22 मे रोजी दरवर्षी मान्सून दाखल होतो आणि 1 जून रोजी केरळमध्ये येतो. परंतु यावर्षीची परिस्थिती वेगळी आहे. चक्रीवादळ आणि बदललेल्या परिस्थितीमुळे 22 मेची तारीख हुकणार आहे. केरळमध्ये नेमका कधी येणार, याबद्दल निश्चितता नाही. मागच्या वर्षी 1 जूनच्या ऐवजी 3 जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाला होता. यावर्षी 11 जून रोजी मान्सून मुंबईत दाखल होणार होईल तर 7 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून येईल, असं स्कायमेटने सांगितलं आहे. तज्ज्ञांच्या मते यंदा मान्सूनची गती धिमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य सल्ला घेऊनच पीकपेऱ्याचं नियोजन करावं, असं आवाहन करण्यात आलेलं आहे.