मुंबई : आता रेल्वे भरतीतही माजी अग्निवीरला आरक्षण दिले जाणार आहे. यासोबतच त्यांना पीईटी परीक्षेतही सूट देण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे आपल्या भरतीमध्ये अग्निवीरांसाठी 15 टक्के पदे राखीव ठेवणार आहे. या संदर्भात रेल्वेकडून मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. यापूर्वी, केंद्र सरकारने बीएसएफ भरतीमध्ये माजी अग्निवीरांसाठी 10 टक्के पदे राखीव ठेवण्याची घोषणा केली होती.
निमलष्करी दलातही माजी अग्निवीरांच्या भरतीसाठी एक वेगळी श्रेणी तयार केली जाईल. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी नुकतीच ही माहिती संसदेत दिली. लाइव्ह हिंदुस्थानच्या वृत्तानुसार, माजी अग्निवीरांना रेल्वेच्या लेव्हल-1, चतुर्थ श्रेणी पदांवर 10 टक्के आणि लेवल – 2 पदांवर 5 टक्के आरक्षण दिले जाईल.
वयातही सूट मिळेल
अहवालानुसार, रेल्वेने जारी केलेल्या या भरतींमध्ये माजी अग्निवीरांच्या पहिल्या बॅचलाही वयात 5 वर्षांची सूट दिली जाईल. यानंतर माजी अग्निवीरांच्या बॅचला वयोमर्यादेत 3 वर्षांची सूट दिली जाईल. त्यांना पीईटी परीक्षा द्यावी लागणार नाही. रेल्वेने जारी केलेल्या लेव्हल-1 आणि लेव्हल-2 पदांसाठी अर्ज करणाऱ्या माजी अग्निवीरांना पीईटी परीक्षेला बसावे लागणार नाही. माजी अग्निवीरांना फक्त लेखी परीक्षेसाठी हजर राहावे लागेल.
माजी अग्निवीरांना भरतीत आरक्षण
माजी अग्निवीरांना बीएसएफ भरतीमध्ये 10 टक्के आरक्षणासह वयोमर्यादेत सूट दिली जाईल. आता रेल्वेमध्येही लेव्हल-1 पदांच्या भरतीमध्ये 10 टक्के आरक्षणासह वयोमर्यादेत सूट दिली जाईल. भारतीय लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये 4 वर्षांसाठी तरुणांची भरती करण्यासाठी अग्निवीर योजना गेल्या वर्षी सुरू करण्यात आली होती. ज्या अंतर्गत अग्निवीरांची भरती केली जात आहे.