जळगाव: मंजुर झालेल्या पीककर्जाचा बोजा सातबारा उताऱ्यावर लावून देण्यासाठी १३६० रुपयांची लाच घेणाऱ्या खाजगी व्यक्तीला जळगाव एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अटक केली. भगवान दशरथ कुंभार (वय ४४, बांबरूड, ता.पाचोरा) असे अटकेतील संशयिताचे नाव असून ही कारवाई बांबरूड येथे संशयिताच्या घरी करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील ३९ वर्षीय तक्रारदार यांची लासगाव शिवारात आईच्या नावे शेतजमीन आहे. या शेतजमीनीवर तक्रारदार यांच्या आईच्या नावे बँक ऑफ बडोदा शांखा -सामनेर या बँकेकडून १ लाख ३० हजार रुपये पीककर्ज मंजुर करण्यात आले आहे. मंजूर झालेल्या पिककर्जाचा बोझा शेतजमीनीचे सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी तक्रारदार बांबरुड तलाठी कार्यालयात गेले होते. यावेळी भगवान कुंभार याने तलाठ्यांकडून तुमचे काम करुन देतो. या कामाच्या मोबादल्यात १३६० रुपये लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवताच सापळा रचण्यात आला. मंगळवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास बांबरूड येथे आरोपीच्या घराजवळ हा सापळा यशस्वी करण्यात आला. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक एन.एन.जाधव व सहकाऱ्यांनी सापळा यशस्वी केला.