जळगाव : शहरामध्ये घरफोड्यांच्या सत्र सुरू असुन गिरणा टाकी परिसरात असलेल्या पार्वती नगर येथे चोरट्यांनी आपला मोर्चा वळवला होता. त्यांनी अभिराम अपार्टमेंट येथे घरफोडी करून चार लाख रुपयांचा ऐवज लांबविला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्नेहल सौरभ फडके या पार्वतीनगरामध्ये पती व मुलांसह वास्तव्यास आहेत. त्या घराला कुलूप लावून कुटुंबासह वडोदा (ता. मुक्ताईनगर) येथील सासरी गेल्या होत्या. बंद घर असल्याची संधी साधून मध्यरात्री चोरट्यांनी घरफोडी केली. सकाळी १० वाजता वरती राहणारे निखिल टोके यांनी फडके कुटुंबीयांना कॉल करून घरामध्ये चोरी झाल्याची माहिती दिली.
सोन्या चांदीचे दागिने लंपास
स्नेहल फडके यांनी सासूसह घर गाठले. त्यावेळी त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले, तर कपाट फोडलेले होते आणि त्यातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते. तसेच घरातील ८० हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार, ६५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, ८० हजार रुपये किमतीच्या दोन चेन, ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातले, १ लाख रुपये किमतीचे चांदीचे ताट, समई, निरांजन, शिक्के व इतर वस्तूंसह २५ हजार रुपये किमतीचा कॅमेरा. १५ हजार रुपयांची रोकड असा एकूण ४ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे समोर आले. फडके यांनी रामानंदनगर पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.