पुणे : भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुण्यामध्ये पार पडली, या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या राजीनाम्याबाबत जोरदार टोलेबाजी केली आहे. शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात पक्ष अध्यक्ष पदाचा राजीनामा देतो असं जाहीर केलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. तसंच कर्नाटकच्या निकालावरूनही त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर भाष्य केलं आहे. आपल्या खास शैलीत त्यांनी शरद पवारांवर टोलेबाजी केली आहे. “टीआरपी कसा घ्यायचा याचं प्रशिक्षण आपल्याला घ्यावं लागेल. मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो. माझा पक्ष माझ्या राजीनाम्यावर आक्रोश तयार करेल. मग माझा पक्षच ठराव करेल. मग मीच राजीनामा मागे घेईन आणि माझ्या जागी परत येईन. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना आपल्या कृतीतून सांगितलं की राजीनामा देतो म्हणणं आणि राजीनामा देणं यातला फरक काय आहे?” असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.
कर्नाटक पटर्न महाराष्ट्रात चालणार नाही
मतांचं धृवीकरण कितीही करा. कितीही लांगूलचालन करा. कर्नाटक पटर्न महाराष्ट्रात चालणार नाही. इथे फक्त मोदींचा पटर्न चालणार. कर्नाटकमध्ये 700 पेक्षा कमी मतांनी पडलेले उमेदवार 5 आहेत आणि 2 ते तीन हजारांनी पडलेले 42 उमेदवार आहेत. राज्यात भाजप आणि सेनेची युती भक्कम आहे. आज फक्त शिल्लक सेना महाविकास आघाडीकडे आहे. येत्या निवडणुकीत महापालिका असो की लोकसभा की विधनासभा या निवडणुका युतीच जिंकणार, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
उध्दव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंनी 8 मागण्या सर्वोच्च न्यायालयात मांडल्या होत्या. मात्र एकही मागणी मान्य झाली नाही. तरी उद्धव ठाकरे म्हणतात जा जा गावी कोर्टचा निर्णय सांगा…, असं म्हणत फडणवीसांनी टोला लगावला आहे.