नाशिक : ‘सर, कृपया मला पास करून द्या, मी खूप गरीब आहे’, ‘सर मला पास नाही केले तर मी आत्महत्या करून घेईल, त्यामुळे पासिंगचे मार्क देऊन टाका’ अशा विनंती तसेच आत्महत्येच्या धमक्या दहावी, बारावीच्या ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत लिहिल्याचे उघडकीस आले आहे. काहींनी चित्रपटातील नट, नटींचे डायलॉगही उत्तरपत्रिकेवर लिहिले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना डिबार करण्याचा निर्णय नाशिक बोर्डाने घेतला आहे. तसेच उत्तरपत्रिकेत हस्ताक्षर बदलीच्या ३६ केसमध्ये सुपरवायझरवर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.
नाशिक विभागात दोन्ही वर्गांच्या सर्व उत्तरपत्रिका तपासल्या असून निकाल शासनाकडे पाठवला आहे. २ ते २५ मार्च दरम्यान दहावीची परीक्षा झाली. यात जळगाव जिल्ह्यातून ५६ हजार ८१७, धुळ्यातून २८ हजार ४२० तर नंदुरबार जिल्ह्यातून २० हजार ३४१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. तर २१ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान बारावीची परीक्षा झाली. यात जळगाव जिल्ह्यातून ४७ हजार २१४, धुळ्यातून २३ हजार ८७९, नंदुरबार जिल्ह्यातून १६ हजार ७३९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पेपर संपल्यापासून दोन्ही वर्गांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू होते.
उत्तरपत्रिका पाहून शिक्षक चक्रावले
मधल्या काळात शिक्षक संघटनांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कारही टाकला; परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून नंतर त्यांनी बहिष्कार मागे घेऊन अतिरिक्त वेळ देत उत्तरपत्रिका तपासल्या आहेत. दरम्यान, काही विद्यार्थ्यांनी कठीण विषयांच्या पेपर पास करण्यासाठी उत्तरपत्रिकांमध्ये थेट विनंतीचे संदेश लिहिले. तर काहींनी थेट आत्महत्या करण्याच्या धमक्याही दिल्या आहे. अनेकांनी हिंदी, मराठी चित्रपटांमधील डायलॉग देखील लिहिले आहेत. या उत्तरपत्रिका पाहून तपासणी करणारे शिक्षक देखील चक्रावले आहे. दरम्यान, दाेषी विद्यार्थ्यांची नाशिक बोर्डातर्फे चाैकशी करण्यात आली असल्याची माहिती बोर्डाच्या सूत्रांनी दिली.