जळगाव : उन्हाच्या वाढत्या झळांमुळे विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. महावितरणने राज्यात सर्वाधिक मागणीनुसार तब्बल २९ हजार मेगावॅट अखंडित वीजपुरवठा केला. महावितरणच्या यंत्रणेवर ताण वाढला असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण ३ हजार मेगावॅटने जास्त आहे, तर दुसरीकडे महानिर्मितीनेही १० हजार १०२ मेगावॅट एवढा उच्चांकी वीजनिर्मितीचा टप्पा गाठला. त्यामुळे विक्रमी मागणी वाढूनही राज्यावरचे भारनियमनाचे संकट टळले आहे. दरम्यान, मेअखेर किंवा जून महिन्याच्या पंधरवड्यात वीज मागणी आणखी वाढेल, असा महावितरणचा अंदाज आहे.
राज्यात मे महिन्यात २८ हजार ते २८ हजार ५०० मेगावॅटच्या जवळपास मागणी कायम आहे. मात्र, आता ही मागणी २९ हजार मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे. महानिर्मितीच्या औष्णिक, गॅस, जलविद्युत व सौर ऊर्जा प्रकल्पांतून १३ हजार १५२ मेगावॅट वीजनिर्मितीची क्षमता आहे. औष्णिक संचांतून राज्याला सरासरी ६ ते साडेसहा हजार मेगावॅटचा पुरवठा होतो. राज्यातील विजेच्या मागणीत उन्हाळ्यात अपेक्षित वाढ लक्षात घेऊन महानिर्मितीने वीजनिर्मिती वाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. महानिर्मितीच्या औष्णिक केंद्रांतून सहा ते साडेसहा हजार मेगावॅट विजेची निर्मिती होते. मात्र महानिर्मितीने आता औष्णिक ८ हजार मेगावॅटचे उद्दिष्ट निश्चित करून दिले. त्यामुळे महानिर्मितीतून विजेची निर्मिती वाढली आहे.
राज्यातील प्रकल्पांमधील वीज निर्मिती क्षमता
महानिर्मिती कंपनीची राज्यात औष्णिक वीजनिर्मिती केंद्राची वीजनिर्मिती क्षमता ९ हजार ५४० मेगावॅट आहे, तर गॅस प्रकल्पांतून ६७२ मेगावॅट वीजनिर्मिती होऊ शकते. हायड्रो अर्थात जलविद्युत प्रकल्पांची क्षमता २५८० मेगावॅट आहे, तर सौर प्रकल्पांतून २३० मेगावॅटपर्यंत निर्मिती होते. खासगी व महानिर्मिती अशी मिळून १६ हजार ८०० मेगावॅट वीजनिर्मिती होते. उर्वरित मागणीनुसार सेंट्रल सेक्टरकडून पुरवठा होतो. १० हजारांवर टप्पा गाठला
राज्यातील महानिर्मितीच्या औष्णिक केंद्र, गॅस, हायड्रो व सौर प्रकल्पांतून महानिर्मितीने १७ मे रोजी रात्री ७.४५ वाजता एकूण १०,०७० मेगावॅटचा पल्ला गाठला. सध्या महानिर्मितीच्या सर्व संचांतून वीजनिर्मिती सुरू आहे. ८० टक्के पीएलएफ (प्लँट लोड फॅक्टर) ठेवून विजेची निर्मिती करण्यावर प्रशासनाचे लक्ष आहे.