जळगाव : जिल्ह्यात अवैधरित्या शस्त्र तस्करीचे प्रमाण वाढले आहे. याविरुध्द पोलिस प्रशासनाने धडक मोहिम हाती घेतली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यात एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई करुन मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार गावठी कट्टे, पाच तलवारी, 2 चॉपर, 1 चाकू असा शस्त्रसाठा हस्तगत केला आहे.
जिल्ह्यात बेकायदा शस्त्र बाळगून दहशत माजवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर स्थानिक गुन्हे शाखा, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी पथक आणि एमआयडीसी पोलिसांनी कारवाईसाठी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पथकं रवाना केली. जळगाव शहरात अजिंठा चौफुलीच्या पुढे रात्री एस. टी वर्कशॉप जवळ अंधारात काही ईसम हे मोटार सायकली घेऊन उभे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या ठिकाणी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोना हेमंत कळसकर, चंद्रकात पाटील, प्रदीप पाटील, दिपक चौधरी, अशपाक शेख अशांनी मध्यरात्री ३ वाजता रस्ता लुट व दरोडयाच्या प्रयत्नात असलेले स्वप्नील उर्फ गोल्या धर्मराज ठाकुर, (वय-१९), निशांत प्रताप चौधरी (वय १९), पंकज चतुर राठोड (वय- १९), यश देवीदास शंकपाळ (वय १९) यांसह दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ गावठी बनावटचे पिस्टल, चाकु, मिरचीची पुड, दोर, ३ जिवंत काडतुस, दोन मोटार सायकली असे साहित्य मिळून आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, पोना योगेश बारी हे करीत आहेत.
भुसावळात दोन ठिकाणी कारवाई…
भुसावळ शहरात वाल्मीक नगर परिसरातून उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने ललित तुलसीदास खरारे, जितेन आनंद बोयत यांच्याकडून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतूस, दोन मोबाईल, एक दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात मयुर नारायण मोरे याने विना परवाना गावठी पिस्तूल आणि तलवारी बाळगल्या असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाली होती. मयुर मोरे व कल्पेश राजू मोरे यांच्याकडे एक गावठी पिस्तूल, ५ तलवारी, १ काडतूस मिळून आले. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अडावद येथे कारवाई…
अडावद येथे एक तरुण गावठी कट्टा तस्करी करणार असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी रविंद्र पाटील, दीपक शिंदे यांना मिळाली होती. पथकाने लागलीच धाव घेत बस क्रमांक एमएच.२०.बीएल.२२७७ मध्ये बसलेल्या रमेश घुमरसिंग भिलाला याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि जीवंत काडतूस मिळून आला. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.