जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी नाट्यमय घटना घडून शामकांत सोनवणे यांची तर उपसभापतीपदी पांडुरंग पाटील यांची निवड करण्यात आली.
या निवडणुकीच्या वेळेस महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने वाद झाल्याचे दिसून आले. मात्र भाजप-शिंदे गटाच्या पाठिंब्याने आघाडीचे सभापती पदाचे उमेदवार शामकांत सोनवणे विजयी झाले.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलने दणदणीत विजय संपादन केला होता. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला ११ जागा मिळाल्या होत्या. तर भाजप-शिवसेनेच्या पॅनलला सहा तर एक अपक्ष निवडून आला होता. यामुळे मविआचा सभापती होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. यात सभापतीपदासाठी महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शामकांत सोनवणे आणि लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांच्यात चुरस होती. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती आणि उपसभापती निवड प्रक्रियेला प्रारंभ झाला. यात सभापतीपदासाठी श्यामकांत पाटील तर उपसभापतीपदासाठी पांडुरंग पाटील उर्फ राजू सर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, याचप्रसंगी महाविकास आघाडीतर्फे लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांनी देखील सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. विहित कालावधीत त्यांनी अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक झाली.
मारहाण केल्याचा आरोप….
महाविकास आघाडीचे उमेदवार लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांनी आघाडीचेच दुसरे उमेदवार श्यामकांत सोनवणे यांनी मारहाण केल्याचा आरोप केला. तसेच सभागृहातही दमदाटी करून हात उंच करून मतदान करावयास लावल्याचा गंभीर आरोप केला. मात्र, हा आरोप श्यामकातं सोनवणे यांनी फेटाळाला आहे. दोघांमध्ये मतदान होवून श्यामकांत सोनवणे हे १८ पैकी १५ मते घेवून विजयी झाले. तर उपसभापतीपदी महाविकासचे पांडूरंग पाटील यांची बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे भाजप आणि शिंदे गटाच्या संचालकांची मतेही आघाडीचे उमेदवार श्यामकांत सोनवणे यांना मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.