मुक्ताईनगर : गुटखा तस्करीचे मुख्य केंद्र असलेल्या मुक्ताईनगरात येथील आमदार चंद्रकांत पाटील यांनी मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणारा बंदी असलेला लाखोंचा गुटखा असलेली मालवाहू गाडी शहरातील संत मुक्ताबाई महाविद्यालयासमोर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला.
सर्रास गुटखा मध्य प्रदेशातून आणला जात असल्याचे पुन्हा निष्पन्न झालेले आहे. चेक पोस्ट नाक्यावरून ह्या गाड्या पास होतातच कशा असा प्रश्न असून सर्व काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अर्थपूर्ण व्यवहारातून होत असल्याचे समजते. पाच लाखाच्या मालवाहू गाडीसह पोलिसांनी अवैधरित्या वाहतूक होत असलेला 20 लाख 70 हजाराचा विमल गुटखा असा 25 लाख 70 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांनी जप्त केला मुद्देमाल
मध्य प्रदेशातून मुक्ताईनगर तालुक्यात अवैधरीत्या गुटखा वाहतुक करणारी गाडी येत असल्याची गुप्त माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांना मिळाली होती. पोलिस ठोस कारवाई करीत नसल्याने आमदार पाटील यांनी स्वतः गुटख्याची मालवाहू गाडी क्रमांक क्रमांक- एम. एच. १९ सीवाय ९२८७ अडवून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिली.