पाचोरा : भडगाव तालुक्यातील कजगाव येथील बसस्थानक परिसरात असलेले अतिक्रमण काढण्यात याव्या, या मागणीसाठी तक्रारदार यांनी पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रेाल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पाचोरा शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळण्यात यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील कजगाव बसस्थानक परिसरात अतिक्रमण करण्यात आलेले आहे. यावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, भडगाव तहसील कार्यालय, पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्याकडे वारंवार निवेदन तक्रारी व अर्ज केलेले आहे. मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. याबाबत भूषण पाटील, स्वप्निल पाटील, चेतन पाटील आणि जीवन चव्हाण सर्व रा. कजगाव ता. यांनी तक्रार केली होती. अतिक्रमण काढण्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे या तरुणांनी मंगळवारी २३ मे रोजी दुपारी १ वाजता पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रेाल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस प्रशासन आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी वेळीच दाखल झाल्यामुळे प्रयत्न प्रशासनाने हाणून पाडला आहे.