मुंबई: हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्स विकण्याची स्पर्धाच लागली होती. त्यावेळी GQG पार्टनर्सने समूहाच्या चार शेअर्समध्ये सुमारे 15,446 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यावेळी, GQG Partnersचे सह-संस्थापक राजीव जैन यांच्या या निर्णयावर बरेच लोक विश्वास ठेवत नव्हते. पण, ज्या विश्वासाने राजीव जैन यांनी अदानी ग्रुपमध्ये गुंतवणूक केली होती, त्या विश्वासाला फळ मिळाले आहे. या गुंतवणुकीतून केवळ गेल्या 100 दिवसांत त्यांना 8500 कोटींचा फायदा झाला. GQG च्या अदानी शेअर्समधील गुंतवणुकीचे मूल्य आता 24 हजार कोटी रुपये झाले आहे.
CnbcTV18 हिंदी मधील वृत्तानुसार, राजीव जैन यांनी आता मॅक्स हेल्थकेअर या हॉस्पिटल चेन चालवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी भागीदारी केली आहे. सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर या शेअर्सबाबत एक विशेष माहिती समोर आली होती. GQG Partners ने मॅक्स हेल्थकेअरचे 75.5 लाख शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहेत. NSE च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, GQG Partners Emerging Markets Equity Fund ने हे शेअर्स 549.70 रुपये प्रति शेअर या किमतीने खरेदी केले आहेत. या डीलची एकूण किंमत 415 कोटी रुपये आहे.
15,446 कोटींची गुंतवणूक
राजीव जैन यांनी अदानी समूहातील 4 कंपन्यांमध्ये 15,446 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. राजीव यांनी अदानींच्या 4 शेअरमध्ये, अदानी इंटरप्राईजेस, अदानी पोर्टस आणि स्पेशल इकोनॉमिक झोन, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रांसमिशनमध्ये गुंतवणूक केली. अदानींच्या सर्वच शेअरमध्ये तेजीचे सत्र असल्याने सध्या त्यांच्या या गुंतवणुकीचे मूल्ये पण वधारले आहे. या गुंतवणुकीचे बाजारातील मूल्य जवळपास 24 हजार कोटी रुपये आहे. अदानी समूहात या पडत्या काळात ज्यांनी गुंतवणूक केली. त्यांना प्रचंड फायदा झाला.
अदानी समूहाच्या शेअरमध्ये तेजी
सुप्रीम कोर्टाच्या विशेष समितीच्या अहवालानंतर अदानी समूहाला मोठा दिलासा मिळाला होता. समूहाच्या 10 सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर तुफान तेजीत आहे. सोमवार आणि आज मंगळवारी तेजीचे सत्र कायम होते. काल पण हे शेअर 19 टक्क्यांनी वधारले. सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष समितीने अदानी समूहाच्या शेअरमधील भावात कोणतीच गडबडी नसल्याचा अहवाल दिला होता. याविषयीचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात आला. सेबीच्या तपासातही काहीच हाती लागले नसल्याचे समोर आले आहे.