अहमदनगर : केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC परीक्षेचा निकाल नुकतीच जाहीर झालाय. ही परीक्षा पास होऊन सरकारी अधिकारी होण्याचं लाखो तरुणांचं स्वप्न असतं. पण, खडतर परीक्षा आणि तीव्र स्पर्धेमुळे मोजकेच विद्यार्थी यामध्ये यशस्वी होतात. यावर्षी झालेल्या युपीएससीच्या परीक्षेत संगमनेर येथील मंगेश पाराजी खिलारी याने यश मिळवले आहे. 396 वा क्रमांक मिळवित ग्रामीण भागातील मुलेही स्पर्धा परीक्षेत मागे नसल्याचे त्याने दाखवून दिले.
मंगेशचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि शुक्लेश्वर विद्यालयात झाले. त्यानंतर, त्यांनी अकरावीला संगमनेरमधील श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. तेथे बारावीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे पुण्यातील एसपी महाविद्यालयातून कला शाखेत पदवी मिळविली आणि पुण्यातच राहून अभ्यास केला.
पुण्यात घेतले पदवीचे शिक्षण
मंगेश यांनी पुण्यात जाऊन पदवीपर्यंतचे शिक्षण घेत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या अभ्यासाचीसुद्धा तयारी सुरू केली. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आयपीएस अधिकारी व्हायचेच आहे, अशी जिद्द मनाशी ठेवून त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. गेली तीन ते चार वर्ष ते या परीक्षेची तयारी करत होते. अखेर मंगळवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला. या परीक्षेत मंगेश खिलारी यांनी देशात 396 वा क्रमांक प्राप्त केला असल्याचे स्वतः त्यांनी आपल्या आई-वडिलांना भ्रमणध्वनीवरून सांगितले.
आर्थिक अडचणीवर मात करुन मिळवले यश
आजपर्यंत खूप कष्ट केले, मात्र आज मुलाचे यश पाहून आनंद झाला, असे सांगताना मंगेश याचे वडील पाराजी आणि आई संगीता यांना आनंदाश्रू अनावर झाले होते. मंगेशने सुरुवातीपासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा ध्यास घेतला होता. बारावी विज्ञान शाखेत चांगले गुण मिळवून, त्याने कला शाखा निवडण्याचा जो निर्णय घेतला, तो योग्य होता, असे मंगेश यांच्या मित्राने सांगितले. आर्थिक अडचण असताना त्यातच स्वत:च्या गरजा पूर्ण करत भावाने यश मिळविले, असे त्याचे बंधू रवींद्र खिलारी याने सांगितले.