मुंबई : जनशक्ती प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना अखेर मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यांची दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
गेल्या 20 वर्षापासून आमदार बच्चू कडू दिव्यांगांसाठी लढा देत आहेत. अखेर आमदार बच्चू कडू यांना शासनाकडून मंत्री पदाचा दर्जा जाहीर करण्यात आला. दिव्यांग कल्याण खात्याचे अभियान दिव्यांगांच्या दारापर्यंत पोहचवण्यासाठी बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे.
दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडविणार
आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. बच्चू कडू म्हणाले, मोठ्या संघर्षानंतर आता देशातील पहिलं दिव्यांग मंत्रालय सुरू झाले आहे. पण, ते दिव्यांग बांधवापर्यंत गेलं पाहिजे. ही संकल्पना आमचीच होती. त्या बांधवांची मागणी काय आहे, त्यांच्या समस्या काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे, असंही बच्चू कडू म्हणाले.
नाराजी दूर होणार
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर बच्चू कडू यांना मंत्रीपद मिळेल, असे वाटत होते. पण बच्चू कडू यांना अद्याप मंत्रीपद मिळाले नव्हते. परंतु आता दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. त्यांना मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. दरम्यान बंडखोरीला पाठिंबा दिल्यानंतरही मंत्रीपद मिळत नसल्याने बच्चू कडू हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नाराज असल्याची चर्चा होती. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने बच्चू कडूंची नाराजी थोडीतरी दूर होईल असा अंदाज आहे. मंत्रीपद मिळत नसल्यामुळे बच्चू कडू यांनी स्वत:ही अनेकदा उघड नाराजीचे विधाने केली होती.