नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या. महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रादेशिक पक्ष म्हणून ख्याती असलेल्या पक्षात अभूतपूर्व अशी फूट पडली. ही फूट कधीही न भरुन काढता येईल इतकी मोठी आहे. या फुटीनंतर महाराष्ट्रात सत्तांतर घडून आलं. संपूर्ण देश या घटनेमुळे अवाक झाला. राज्यातील जनतेलादेखील मोठा धक्का बसला. त्यानंतर राज्यात गेल्या दहा महिन्यांमध्ये अनेक घडामोडी घडल्या. मुख्य शिवसेना पक्ष दोन पक्षात विभागला गेला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असे दोन वेगळे पक्ष तयार झाले. या दोन्ही बाजूने प्रचंड राजकीय असंतोष आहे. सुप्रीम कोर्ट, केंद्रीय निवडणूक आयोगाने या प्रकरणावर निकालही दिले आहेत. आता जनतेच्या दरबारात अंतिम फैसला होणार आहे. यासाठी पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. कारण पुढच्या वर्षी राज्यातील 48 लोकसभेच्या जागांसाठी मतदान पार पडणार आहे. महाविकास आघाडीच्या तीनही घटत पक्षांकडून आपण एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण तरीही जागा वाटपावरुन मतभेद असल्याच्या चर्चा समोर येत आहेत. असं असलं तरी आता यामध्ये नागपूरच्या एका बड्या नेत्याने सर्वात मोठा दावा केला आहे. हा दावा म्हणजे शिवसेनेचे दोनही पक्ष पुन्हा एकत्र येणार. त्यामुळे आता आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
नेमका कुणी केलाय दावा?
काँग्रेसच्या हायकमांडने माजी आमदार आशिष देशमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. देशमुखांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आशिष देशमुख यांनी महाविकास आघाडी, शिवसेना आणि ठाकरे गट यांच्याबद्दल सर्वात मोठा दावा केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावरुन महाविकास आघाडीत मतभेद होतील. त्यातून महाविकास आघाडी तुटणार, असा दावा आशिष देशमुख यांनी केला आहे.
आशिष देशमुख नेमकं काय म्हणाले?
“महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबतची एक यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या यादीत कोणत्या पक्षाचा उमेदवार कोणत्या मतदारसंघात उभा राहील, याबाबत सविस्तर माहिती स्पष्ट करण्यात आली आहे”, असं आशिष देशमुख म्हणाले. “माझं महाविकास आघाडीबाबत एक मत आहे, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि ठाकरे गटाची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही येणाऱ्या काळात भाजपसोबत जाईल. त्यामुळे महाविकास आघाडीचे तीनही घटक पक्ष एकत्रित राहणार नाहीत, असं माझं एकत्रित मत आहे”, असं भाकीत आशिष देशमुख यांनी वर्तवलं आहे.