मुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. एकीकडे भाजप पुन्हा एकदा सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्नात असून, दुसरीकडे भाजपविरोधक पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे गट एकत्र मिळून ही निवडणूक लढणार आहे. भाजप-शिवसेना युतीत शिंदे गटाला किती जागा मिळणार याची चर्चा सुरु असतानाच, शिंदे गटाच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी शिंदे गटाच्या खासदारांची आढावा बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 13 खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भातही या बैठकीत चर्चा झाली. भाजप-शिवसेना जागावाटपाच्या सूत्रानुसार शिवसेना 48 पैकी 22 जागा लढवणार असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या बैठकीनंतर खासदार गजानन कीर्तिकर यांनी ही माहिती दिली.
‘या’ खासदारांना मिळणार उमेदवारी
उद्धव ठाकरेंपासून वेगळे होऊन शिंदे गटात सामील झालेल्या 13 खासदारांची उमेदवारी कायम राहणार आहे. मात्र, उर्वरित पाच जागा आणि इतर चार म्हणजे रायगड, शिरूर, औरंगाबाद आणि अमरावती, ज्या तत्कालीन शिवसेनेने गमावल्या होत्या, त्यावर साहजिकच आमचा दावा असेल. तसेच 13 विद्यमान खासदार आणि इतर जागांचा आढावा घेतला जाईल आणि त्या दृष्टीकोनातून लोकसभा निवडणुकीची तयारी केली जाईल, असेही कीर्तिकर यांनी सांगितले.