पुणे : विद्यार्थ्यांना शाळेत जाताना दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी यावेळी अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तिक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने येत्या नव्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या पुस्तकांची रचना बदलली आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचा भार जवळपास 75 टक्क्यांनी कमी होणार आहे. त्यामुळे पालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचं पुस्तकांचं ओझं कमी करण्यासाठी बालभारतीने नवीन संकल्पना आणली आहे. विद्यार्थ्यांना आता सगळ्या विषयांचे वेगवेगळे पुस्तकं घेऊन जाण्याची आवश्यकता राहणार नाही. कारण एकाच पुस्तकात सर्वच विषयांचे पाठ असणार आहेत. विशेष म्हणजे अभ्यास करताना विद्यार्थ्यांना महत्त्वाची नोंद करता यावी यासाठी पुस्तकातच वहिची पानं जोडण्यात आले आहेत. बालभारतीकडून पुस्तकांचे एकूण चार भाग करण्यात आले आहेत. या भागांमध्ये वेगवेगळे विषय अंतर्भूत करण्यात आल्याचे बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले.
नव्या पुस्तकांचे चार भाग
प्रत्येक भागात प्रत्येक विषयाचे धडे असणार आहेत. या नव्या पुस्तकात प्रत्येक धड्यामागे वहीचे एक पान असणार आहे. या पानाचे नाव माझी नोंद असे असणार आहे. या माझी नोंदच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्येक धड्यानंतर विद्यार्थ्याला त्याची नोंद देखील करण्यात येणार आहे, असे यावेळी पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की या नव्या पुस्तकांचे चार भाग करण्यात आले आहेत. प्रत्येक भागात वेगवेगळ्या विषयांचे धडे देण्यात आले आहे.
75 टक्के दप्तराचे ओझे कमी होणार
यंदा चार भाग करण्याचा फायदा असा की पहिल्या तिमाही भागासाठी आत्ता विद्यार्थ्यांना एकच पुस्तक घेऊन जावे लागणार आहे. यामुळे जवळपास 75 टक्के दप्तराच ओझे हे कमी होणार आहे. विद्यार्थ्यांना हे चारही भागांचे पुस्तक एकत्रित देण्यात येणार आहे. मुलांना पहिल्या तिमाही परीक्षेसाठी एक पुस्तक आणि पुढील तिमाहीसाठी एक असे वर्षभरात चार पुस्तके घेऊन जाता येणार आहेत.
चारही पुस्तकांमध्ये अनुक्रमणिका
नव्या शैक्षणिक वर्षात नवीन पुस्तके बालभारतीकडून प्रकाशित करण्यात येणार आहेत. मुलांना धड्याबाबत महत्त्वाची नोंदही लिहिता येणार आहे. या चारही भागातील पुस्तकांमध्ये अनुक्रमणिका देण्यात आली आहे. त्यात मराठी, इंग्रजी, हिंदी, गणित, सामान्य विज्ञान, इतिहास व नागरिक शास्त्रज्ञ, भूगोल या विषयाचे धडे देण्यात आले आल्याचे पाटील म्हणाले.