जळगाव : जळगाव शहरात मांजराने चावा घेतल्यामुळे ११७ जाने रुग्णालयात उपचार घेतल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव महापालिका आता मांजरीचे निर्भीजीकरण करणार आहे. शहरात मांजरींची संख्या कुत्र्यांच्या तुलनेत कमी आहे, तसेच त्यांचा आकारही लहान आहे. पण त्यांच्या निर्बिजीकरणावर होणारा खर्च मात्र कुत्र्यांपेक्षा दुपटीहून अधिक आहे.
एका कुत्र्याच्या निर्बिजीकरणास मनपा ९३८ रुपये खर्च करते. मांजरीसाठी मात्र तोच खर्च २००० रुपये होणार आहे. जळगाव शहरात किती भटक्या मांजरी आहेत, याची कोणतीही आकडेवारी महानगरपालिकेकडे नाही. वर्षभरात मांजर चावल्यामुळे उपचारासाठी जाणाऱ्यांची संख्या केवळ ११७ आहे. त्यापैकी एकानेही तक्रार केलेली नसल्यामुळे चावलेल्या मांजरी या पाळीव असण्याचीच शक्यता अधिक आहे. तरीही येत्या महासभेत भटक्या मांजरींचे निर्बिजीकरण करण्यासाठी प्रत्येक मांजरीमागे दोन हजार रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव मांडला जाणार आहे.
सर्वसाधारण सभेत प्रस्ताव सादर
भटक्या कुत्र्यांप्रमाणेच भटक्या मांजरांवर नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या निर्बिजीकरणाची माेहीम राबवावी, असे निर्देश थेट राज्य शासनाने जारी केले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची असल्यामुळे प्रशासनाने एक प्रस्ताव महापालिकेच्या येत्या सर्वसाधारण सभेसमोर सादर केला आहे.