जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महापालिकेत सध्या आलम ( तुरटी ) या विषयाच्या ठेक्यावरून सत्ताधारी असलेल्या शिवसेना नगरसेवकांमध्ये अंतर्गत धुसपूस सुरु असून हा ठेका आपल्यालाच मिळावा म्हणून सेनेच्या पदाधिकारी व नगरसेवकांमध्ये रस्सीखेच सरू असल्याचे समजते.
पाणी शुद्ध व निर्जन्तुकीकरण करण्यासाठी लागणारी पिवळी आलम (तुरटी) चा ठेका आपल्यालाच मिळावा त्याची मलई आपल्यालाच खाता यावी म्हणून पालिकेच्या दोन उच्चपदस्थ पदाधिकाऱ्यांनी यावर डल्ला मारल्याने शिवसेनेत काही नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे एक उच्चपदस्थ पदाधिकारी एका कंपनीचा मालक नवरा आणि दुसरीचा मालक त्याची बायको असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या नगरसेवकाने त्यांच्यावर आरोपांची तोफ डागली आहे.
यासंदर्भात स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक प्रशांत नाईक यांनी या ठेक्याच्या विषयावर स्थायी सभापतींनाच पत्र लिहून त्यांची झाडाझडती घेतल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. तारेवरची कसरत करत मोठ्या मुश्किलीने शिवसेनेला पालिकेत सत्ता मिळाली त्यानंतर भाजपमधून आलेले बंडखोर नगरसेवकांचा डोळा विविध ठेक्यांवर होता. भाजपात असतांना देखील ठेक्याच्या विषयावरून नगरसेवकांमध्ये खडाजंगी सुरु होती. आपल्यालाच ठेका मिळावा म्हणून काही नगरसेवक प्रयत्नशील होते. आता मात्र तीच परिस्थिती सत्ताधारी शिवसेनेत झाली आहे. ठेक्याच्या विषयावरून सेना पदाधिकारी आणि नगरसेवकांमध्ये अंतर्गत धुमश्चक्री उडाली आहे. हा वाद मिटावा म्हणून पालिकेतील शिवसेनेच्या एका जेष्ठ नेत्याने प्रयत्न सुरु केले. त्यांनी दोघा तिघांची समजूत घातली आणि संबंधितांना ठेक्याच्या विषयात उच्चपदस्थ पदाधिकाऱ्यांनी ढवळाढवळ करू नये असे बजावले आहे. तर सेना नगरसेवक अद्याप शांत झालेले दिसत नसून, आगामी होणाऱ्या सभेत हा विषय मोठ्या प्रमाणात येऊ शकतो अशी दाट शक्यता आहे.
सर्वसामान्य जनतेला शुद्ध व निर्जन्तुकीकरण करून तुरटीच्या माध्यमातून चांगले पाणी मिळावे म्हणून प्रयत्न करणाऱ्या उच्चपदस्थ पदाधिकाऱ्यांनी या ठेक्यात मोठा आर्थिक डल्ला मारला असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच पालिकेच्या माध्यमातून विविध विकास कामांचे छोटे मोठे ठेके घेणाऱ्यांनी मात्र या विषयावर मौनव्रत धारण केले आहे. कारण तुरटी खरेदीची निविदा प्रक्रिया राबवितांना आयुक्त व पदाधिकाऱ्यांनी पारदर्शकता ठेवली नसल्याचे बोलले जात आहे. सर्व नियम निकष धाब्यावर बसवण्यात आले आहे.