नवनियुक्त तालुका अध्यक्ष शिवराज पाटलांच्या प्रभावी जनसंपर्काचा झाला फायदा
जळगाव राजमुद्रा (कमलेश देवरे)| नुकतेच जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी गाजत असताना अचंबित करणारे निकाल समोर आले आहे. संघटनात्मक दृश्य शिंदे गटाने जळगाव तालुक्यात केलेले बदल याला मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरत आहे. तालुक्याची संपूर्ण कार्यकारणी बदलल्यानंतर शिंदे गटाला अधिक फायदा झाल्याचे दिसून येत आहे.
जळगाव तालुका अध्यक्षपदी नुकतेच शिवराज पाटील यांचे नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच झालेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाला सकारात्मक असा प्रतिसाद जनतेने दिला आहे. यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तत्कालीन तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण हे बाजार समितीच्या सभापती पदाचे दावेदार असताना मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते निवडणुकीत मिळालेल्या अपयशामुळे त्यांनी आपल्या पदाचा थेट राजीनामा दिला होता, त्यानंतर नवनियुक्त तालुकाध्यक्ष शिवराज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती.
जळगाव तालुक्यामध्ये शिवसेना शिंदे गटाने मुसंडी मारली आहे. 15 ग्रामपंचायतींपैकी एकूण 13 ग्रामपंचायतीमध्ये महायुतीला यश आले आहे. तर एकट्या शिवसेना शिंदे गटाला तेरा जागा मिळाल्या आहेत. भाजपाला जळगाव तालुक्यामध्ये पाहिजे तितकं यश आलेले नाही, देशात व राज्यात सत्तेचा पाहिजे तेवढा प्रभाव जळगाव तालुक्यात दिसून आलेला नाही. त्यामुळे भाजपाला आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदल तसेच जनतेमध्ये जाऊन अधिक मेहनत करावी लागणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये शिंदे गटाला मोठा पराभवाचा सामना करावा लागला होता यामध्ये ठाकरे गटाची मोठी सरशी झाल्याचे राजकीय वर्तुळात पाहायला मिळाले होते. यामुळे शिंदे गटात बाजार समितीच्या झालेल्या अपयशामुळे मोठ्या प्रमाणात मरगळ आल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र संघटनात्मक बदल झाल्यानंतर तालुकाध्यक्ष म्हणून युवा चेहरा शिंदे गट – शिवसेनेकडून देण्यात आला, तालुक्यात असलेली सक्रियता तसेच तालुकाध्यक्ष म्हणून शिवराज पाटील यांनी आयोजित केलेला जिल्हा परिषद पंचायत समिती गट – गन दौऱ्याचा मोठा प्रभाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालातून जमेच्या बाजू ठरल्या आहेत.
यामध्ये त्यांना जिल्हाप्रमुख निलेश पाटील, सावखेडा येथील सरपंच जितेंद्र पाटील, यांच्या सह प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आयोजित दौऱ्या दरम्यान स्थानिक ग्रामपंचायतच्या लोकप्रतिनिधींच्या जाणून घेतलेल्या समस्या तसेच सातत्याने ठेवलेला जनसंपर्क अधिक लाभदायी ठरला आहे.
नवनियुक्त तालुकाध्यक्ष शिवराज पाटील हे पाणीपुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. त्यांचे दिवंगत वडील रावसाहेब पाटील देखील गुलाबराव पाटील यांचे विश्वास होते सुरुवातीच्या काळापासून त्यांनी शिवसेनेत आपली राजकीय कारकीर्द गाजवली होती. ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते थेट जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं होतं. प्रामाणिक सच्चा शिवसैनिक म्हणून त्यांची जळगाव जिल्ह्याभरात ओळख होती.
मात्र त्यांच्या मृत्यूप्रशात राजकीय जबाबदारी त्यांचे पुत्र असलेले शिवराज पाटील यांच्याकडे आली. तेव्हापासून शिवराज पाटील देखील युवा सेनेच्या माध्यमातून शिवसेनेत सक्रिय झाले. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जवळचे तसेच जळगाव तालुक्यात सक्रिय शिवसैनिक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. शिवसेनेच्या फुटी नंतर संपूर्ण राज्यात अराजकता माजलेले असताना तसेच जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना सर्व विरोध जुगारून त्यांनी गुलाबराव पाटील यांची साथ कायम ठेवली आहे.