मुंबई (राजमुद्रा) आमच्यामुळे श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून गुलाल लागला होता, तर आम्ही तो गुलाल काढून घेऊ शकतो, आम्ही ते करून दाखवू असं जाहीर आव्हान शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिलं आहे. येत्या आठ दिवसात कल्याणचा उमेदवार जाहीर होणार असून आपण त्यासाठी प्रचार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कल्याणमधील सभेत त्या बोलत होत्या. या सभेत सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचं भाजप नेत्यांवर सडकून टीका केली . मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रा अंतर्गत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी दहा ते बारा ठिकाणी भेटीगाठी घेतल्या .
ठाकरे गटाकडून सुषमा अंधारे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. तशी मागणी देखील स्थानिक शिवसैनिकांकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली होती. याबाबत बोलताना सुषमा अंधारे यांनी शिवसैनिकांनी केलेल्या मागणीचा मी मनापासून आदर करते, परंतु मला व्यक्तिगत विचाराल तर अजून माझ्यापर्यंत अधिकृत अशी माहिती पोहोचली नसल्याचं त्या म्हणाल्या.
कल्याण लोकसभेत पक्षप्रमुख जो उमेदवार देतील त्याच्या प्रचार मी करेन, मी या मतदारसंघात तळ ठोकून राहणार, याचा अर्थ असा नाही की मी लगेच निवडणूक लढणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुक्त संवादाच्या दौऱ्याअंतर्गतच कल्याण लोकसभा मतदारसंघात भेटीगाठी घेतल्या, उमेदवार जाहीर करणे हे पक्षप्रमुखांच्या अधिकारात आहे. पुढील आठ दिवसात कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चितपणे जाहीर होईल. जो कोणी उमेदवार असेल तर उमेदवारासाठी सगळे शिवसैनिक ताकतीने लढतील असे सुषमा अंधारे यांनी सांगितले