पुणे (राजमुद्रा)/- नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपचे माजी खासदार निलेश राणे पुण्यातील आर डेक्कन मॉल प्रकरणात अडचणीत आले आहे. त्यांच्यावर पुणे महापालिकेने मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई शहरात एक चर्चेचा विषय बनली आहे.
माजी खासदार निलेश राणे यांच्या नावावर असलेल्या शिवाजीनगर भागातील डेक्कन परिसरातील आर-डेक्कन मॉलमधील तिसऱ्या मजल्यावरील हॉटेलला मिळकतकर थकवल्याप्रकरणी राणे अडचणीत आले आहे. पुणे महापालिकेनं राणे पिता-पुत्राला नोटीस बजावली असून पुणे महापालिकेनं मॉलला टाळं ठोकलं आहे.
महापालिकेने त्यांना अनेक वेळा नोटीस देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे महापालिकेच्या करसंकलन विभागानं जोरदार कारवाई करून ही मिळकत सील केली आहे. महापालिकेने मिळकतीचे वरील तीन मजल्यापैकी दोन मिळकतीचे मजले सील करून ठेवले आहेत. कर संकलन विभागाने त्यांचे थकित मिळकतीचा भाग सील केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून या मिळकतीची तीन कोटी रुपयांहून अधिक बाकी थकली होती.
या प्रकरणावरून पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकी दिली जात होती. यामुळे पालिकेनं कोणतंही पाऊल पुढं टाकलं नाही. मात्र आता पालिकेनं याबाबत महत्त्वाचा निर्णय घेत मिळकतीला टाळे लावले आहेत.
दरम्यान, पुणे महापालिकेच्या या कारवाईनंतर उद्धव ठाकरे गटाकडून आर डेक्कन मॉलच्या बाहेर बँड वाजवून आंदोलन करण्यात आलं आहे.