नवी दिल्ली (राजमुद्रा)दि. 9 मार्च 2024 -लोकसभा निवडणुकीची घोषणा आता लवकरच होणार आहे. यामुळे युती आणि आघाड्यांकडून जागा वाटपावर चर्चा केली जात आहे.लोकसभा निवडणुकीच्या प्रचार आणि उमेदवारांची यादी जाहीर करण्यात भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. त्यानंतर काँग्रेसने यादी जाहीर केली. भाजपची दुसरी यादी महाराष्ट्रातील महायुतीच्या जागा वाटपावरुन रखडली होती. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांचा जागा वाटपाचा तिढा अमित शाह यांच्या महाराष्ट्रा दौऱ्यात कायम होता. त्यामुळे शुक्रवारी मध्यरात्री दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत जागा वाटपाचे सूत्र ठरले. त्यानंतर रात्री दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकाच विमानातून मुंबईकडे आले.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भाजप नेते अमित शाह यांच्यासोबत शुक्रवारी मध्यरात्री दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत राज्याच्या महायुतीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्यात यश आले. दिल्लीत दाखल झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांची शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर खलबते झाले.
त्यानंतर भाजपच्या जागावाटपाच्या सूत्रावर तडजोड झाली. यामुळे भाजपच्या पुढील यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश केला जाऊ शकतो. बैठकीत अजित पवार यांना चार जागा देण्याचे निश्चित करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दहा जागा देण्यात येणार आहे. उर्वरित जागेवर भाजप निवडणूक लढवणार आहे.
महायुतीच्या नेत्यांची दोन तास बैठक चालली. त्यात जागा वाटप निश्चित झाले. दिल्लीत जागा वाटप निश्चित झाल्यानंतर रात्री २ च्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकाच विमानातून मुंबईकडे रवाना झाले. जागा वाटपाचे सूत्र ठरल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह यांच्यासोबत स्वतंत्र बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्येक मतदारसंघात ज्या पक्षाचा उमेदवार जिंकून येऊ शकतो त्यालाच उमेदवार दिला जाईल, असा फॉर्म्युला या बैठकीत ठरला आहे.