पुणे (राजमुद्रा)-: पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेले माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकला आहे. ‘अखेरचा जय महाराष्ट्र… साहेब मला माफ करा’ अशी फेसबुक पोस्ट लिहित वसंत मोरे यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. राज ठाकरेंच्या तसवीरीसमोर लोटांगण घातल्याचा फोटो मोरेंनी शेअर केला आहे. वसंत मोरेंनी पक्ष सोडण्याचा निर्णय हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मोरे आता कोणत्या पक्षाची वाट धरणार, याची उत्सुकता आहे. वसंत मोरे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो… त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो” असं लिहिलेली एक इमेज वसंत मोरे यांनी फेसबुकवर शेअर केली होती. सोमवारी रात्री ११ वाजून ५६ मिनिटांनी तात्यांनी ही पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे इतक्या रात्री मोरे कुठल्या विवंचनेत होते, याची काळजी समर्थकांना लागून राहिली होती. अखेर मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास वसंत मोरेंनी फेसबुक पोस्ट लिहित निर्णय जाहीर केला
याआधी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी काढलेल्या मोर्चात मोरे अनुपस्थित असल्याचं अमित ठाकरेंना वाटलं होतं. त्यावेळी वसंत मोरेंवर अमित ठाकरेंना पुरावा देत पटवून देण्याची वेळ आली होती. “अमित साहेब तुमच्यासाठी काही पण… फक्त मला समजून घ्या. साहेब, मी काम करणारा आहे, नुसता मिरवणारा नाही. त्यामुळे कदाचित गर्दीत तुम्हाला मी दिसलो नसेन, असं वसंत मोरे म्हणाले होते.
त्यापुर्वी, “कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतातच, पण मी पट्टीचा गारुडी आहे” अशा आशयाचं व्हॉट्सअप स्टेटस वसंत मोरे यांनी ठेवल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मनसे नेते साईनाथ बाबर यांच्या खासदारकीचे संकेत दिले असल्यामुळे मोरेंनी कोणाला उद्देशून स्टेटस ठेवलं, अशी चर्चा त्यावेळीही रंगली होती.