रावेर राजमुद्रा (कमलेश देवरे) | गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा मात्र सुटताना दिसत आहे. रावेर लोकसभेची जागा महाविकास आघाडीच्या माध्यमातून वंचित ला सोडण्यात आली होती मात्र रावेर लोकसभा लढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दावा फेटाळण्यात आला होता, काल मुंबई येथे ऑगस्ट क्रांती मैदानावर राहुल गांधींच्या सभेनंतर जागा वाटपाची सूत्र फिरली आहे. रावेर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली असून या ठिकाणी भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
रावेर लोकसभेची निवडणूक ही एकतर्फी करण्यासाठी राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे डमी उमेदवार देणार असा आरोप मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता, खडसे यांच्या सून असलेल्या रक्षा खडसे यांच्या महायुतीतल्या उमेदवारीला देखील मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विरोध दर्शविला होता. तेव्हापासून एकतर्फी रावेर लोकसभेची निवडणूक होते की काय ? असा कयास बांधला जात होता, पक्षातीलच एका गटाने याबाबतची संपूर्ण स्थिती पक्षप्रमुख शरद पवार यांच्याकडे मांडल्यानंतर एकनाथ खडसेंच्या विश्वासातील उमेदवार न देता शरद पवारांनी चाणक्य नीती वापरत उमेदवारीची भाकरी फिरवली आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी देऊन मोठा चेकमेट भाजपला दिला आहे.
आमदार एकनाथराव खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. माजी आमदार संतोष चौधरी गेल्या वीस वर्षापासून सक्रिय राजकारणात नसले तरीही भुसावळ तालुक्यात आपले राजकिय वजन ते राखून आहेत. एकनाथ खडसे हे त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात मात्र भाजप मधील मिळालेली वागणुक तसेच संघटनात्मक वादाला वैतागून खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता एकाच पक्षात असल्याने एकेकाळचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या एकनाथ खडसेंना माजी आमदार संतोष चौधरी यांचा खुलेआमपणे प्रचार करावा लागणार आहे. सून असलेल्या रक्षा खडसे यांच्याविरुद्ध प्रचार करावा लागणार असल्या कारणाने एकनाथराव खडसे यांची एक प्रकारे राजकीय कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादीचे सुप्रिमो शरद पवार यांनी रावेर लोकसभेची संपूर्णतः जबाबदारी खडसे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यामुळे रावेर लोकसभेच्या मुख्य स्टार प्रचारक म्हणून खडसेंना फिरावे लागणार आहे. खडसे विरुद्ध चौधरी अशी जोरदार लढत रावेर लोकसभा क्षेत्रामध्ये होणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या लोकसभा क्षेत्राकडे लागून आहे.
रावेर लोकसभा क्षेत्रातील भाजप मध्ये पक्षांतर्गत वादाला आहे भाजपाचे दिवंगत नेते हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल जावळे यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर राजीनामा सत्र रावेर लोकसभा क्षेत्रामधून भाजपमध्ये सुरू आहे. रावेर, वरणगाव या भागातून भाजप पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सादर केले आहे. गेल्या दहा वर्षांपूर्वी दिवंगत नेते हरिभाऊ जावळे यांची उमेदवारी डावलत तत्कालीन भाजप नेते एकनाथराव खडसे यांच्या सून असलेल्या रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली होती. ह्याच जागेसाठी रावेर लोकसभेचे जिल्हाध्यक्ष असलेले अमोल जावळे यांची दावेदारी पक्की असताना त्यांना डावलून तिसऱ्यांदा रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आल्याने रावेर लोकसभेत राजीनामाची हाय होल्टेज नाराजी पसरली आहे. खा.रक्षा खडसे पक्षांतर्गत नाराजीला कशा समोर जातात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
संतोष चौधरी हे नेहमीच जिल्ह्यात व राज्यात राजकीय चर्चेत राहिले माध्यमांमध्ये देखील त्यांचा नेहमीच बोलबाला राहिला आहे, महत्त्वाचे म्हणजे भाजपचे तत्कालीन नेते एकनाथराव खडसे हे त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी राहिले आहे. अनेक वेळा टीका – टिपणी मुळे राजकीय वाद मोठ्या प्रमाणात टोकाला गेल्याचा देखील बघायला मिळत होते. सून असलेल्या रक्षा खडसे यांच्या विजयासाठी जीवाचे रान करणाऱ्या खडसेंना पारिवारिक आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेशानंतर राजकीय स्थिती बदलली. राष्ट्रवादीकडून संतोष चौधरी यांना उमेदवारी जाहीर झाली असून एकनाथ खडसेंची मात्र कोंडी झाल्याची जोरदार चर्चा रावेर लोकसभा क्षेत्रा सह जिल्हाभरात रंगत आहे.