(राजमुद्रा जळगाव) कोरोना काळात गेल्या दीड वर्षापासून लॉकडाउन जन्य परिस्थितीमुळे सर्वसामान्यांवर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातल्यात्यात कला क्षेत्रात कार्यरत असलेले जिल्ह्यातील कलाकार तथा लोककला सादर करणारे लोककलावंत यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. यासंदर्भात आर्थिक तथा जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीसाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या जळगाव जिल्ह्याच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर तसेच खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना मदतीसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले.
जळगावातील तमाम तमाशा मंडळ, वही गायन, वासुदेव ,गोंधळी सारखे दुर्मिळ प्रकार तसेच नाटक, नृत्य, संगीताची प्रदीर्घ परंपरा असलेला जळगावचा लोककलावंत वर्ग कोरोना महामारीमुळे सध्या बिकट परिस्थितीत आहे. शासकीय स्तरावरून अद्याप या कलावंतांना कोणतीही मदत मिळाली नसून सध्याच्या विदारक परिस्थितीत या कलावंतांना आर्थिक मदतीची तसेच जीवनावश्यक अन्नधान्याची आवश्यकता असून या कलावंतांना मदतीचा हात मिळावा यासाठी प्रयत्न केले जाणार असून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले असल्याचे रोहिणी ताई खडसे खेवलकर यांनी सांगितले.
प्रसारमाध्यमांच्या मार्फतही रोहिणी ताईंनी मदत करू इच्छिणार्यांना मदतीचे आवाहन केले असून आपल्या परीने जेवढे शक्य होईल तेवढी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सोबतच काही प्रतिष्ठित व्यक्तींना प्रत्यक्ष जाऊन प्रत्यक्ष भेटून मदत करता येईल का याबाबत विनंती करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कलाकार हा कलेच्या सदरीकरणावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. मात्र कला सादर होत नसल्यामुळे पोटाची खळगी कशी भरावी हा प्रश्न कलाकारांसमोर निर्माण झाला असल्याने सर्वांना मदतीचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांच्याशी 9422782247 या क्रमांकावर संपर्क कारून कलाकारांच्या मदतीला हात देण्याची जाहीर विनंती केली आहे.