शिरुर, (राजमुद्रा) : शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेमधून आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेणार आहेत. आढळराव पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शिरुर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार असतील. त्यामुळे शिरुरमध्ये पुन्हा एकदा आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशी लढत बघायला मिळणार आहे. आज (26 मार्च)संध्याकाळी चार वाजता मंचरच्या शिवगिरी मंगल कार्यालयात अजित पवार, दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजीराव आढळराव पाटलांचा पक्षप्रवेश होणार आहे.
मागील काही दिवसांपासून शिरुर लोकसभा मतदार संघातील उमेदवार कोण असेल याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यातच आता अमोल कोल्हेंविरोधात आढळराव पाटील राष्ट्रवादीकडून मैदानात उतरणार आहेत. अजित पवार स्वत: आढळराव पाटलांच्या हाती घड्याळ बांधणार आहे. त्यामुळे शिरुरमध्ये शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट उभा ठाकणार आहे.
शिवाजी आढळराव पाटलांना राष्ट्रवादीतून अमोल कोल्हेंच्या विरोधात मैदानात उतरवण्यासाठी सुरुवातीला चांगलाच विरोध होता. मात्र हा विरोध अजित पवारांनी दूर केला आणि त्यासाठी अनेकदा बैठकादेखील घेतल्या. अनेकांच्या समजूतीदेखील काढाव्या लागल्या.
अमोल कोल्हेंना पाडणार म्हणजे पाडणार, असं चंग अजित पवारांनी डिसेंबर महिन्यात बांधला. त्यानंतर अमोल कोल्हेंना पराभूत करण्यासाठी एक उमेदवार आयात करण्याची वेळ आली आहे. शिंदे गटातील आढळराव पाटील आणि अजित पवारांमधील कटुता महाविकास आघाडीच्या सत्तेत राज्यानं पाहिली आहे. त्यावेळी आढळराव पाटलांना अजित पवारांवर फटकेबाजी केली होती त्यावर अजित पवारांनी आपल्या शैलीत त्यांना उत्तरं दिली होती मात्र आता दोघेही एकत्र आले आहेत. दोघे मिळून अमोल कोल्हेंना पराभूत करण्यासाठी जंग जंग पछाडणार आहेत.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अनेक ठिकाणी शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत आहे. मात्र काही मतदार संघात अजित पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. त्यातच बारामती आणि शिरुर मतदार संघात अजित पवारांनी सगळी मेहनत करायला सुरुवात केली आहे. दोन्ही मतदार संघात अजित पवारांसमोर तगडं आव्हान असणार आहे. बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे लढणार आहे तर शिरुरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी अजित पवारांना चांगलाच कस लागणार आहे.