जळगाव (राजमुद्रा) :- शहरातील प्रमुख रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण सुरु असून, त्याअंतर्गत सध्या आकाशवाणी चौक ते स्वातंत्र्यचौकापर्यंतचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, अवघ्या दोन- तीनशे मीटर अंतरासाठी वाहनधारकांना तब्बल अर्धा तास लागतोय.रस्तेकामामुळे ही स्थिती उद्भवणे स्वाभाविक असले तरी याठिकाणी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियमन करणे गरजेचे आहे.
जळगाव शहरात केवळ रस्त्यांच्या कामासाठी म्हणून शासनाने सुरवातीच्या टप्प्यात १०० कोटी व नंतर ८५ कोटींचा निधी मंजूर केला. या निधीतून शहरातील विविध भागात कॉंक्रिटीकरणासह डांबरीकरणाची कामे सुरु आहेत. आधीच्या टप्प्यात काही प्रमुख रस्त्यांसह नागरी वस्त्यांमधील डांबरीकरणाची कामे झाली, आणखी काही कामे होऊ घातली आहेत. तर ८५ कोटींच्या निधीतून शहरातील प्रमुख रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण सुरु आहे.
काव्यरत्नावली ते टॉवर चौक
या प्रमुख रस्त्यांमध्ये पहिल्या टप्प्यात काव्यरत्नावली चौक ते टॉवर चौक या जवळपास तीन किलोमीटरपर्यंतच्या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले. हे काम तीन टप्प्यात होत असून त्यातील पहिला काव्यरत्नावली चौक ते आकाशवाणी चौकापर्यंतचा रस्ता पूर्ण झाला. दुसऱ्याटप्प्यात आता आकाशवाणी ते स्वातंत्र्य चौक व पुढे नव्या बसस्थानकापर्यंतचे काम प्रगतिपथावर आहे.
हे काम सुरु केल्यानंतर दुभजकाच्या एका बाजूचे काम सुरु करुन दुसऱ्या बाजूने वाहतूक वळविण्यात आली आहे. सध्या हे काम स्वातंत्र्य चौकापर्यंत आले आहे. या कामामुळे आकाशवाणी चौकापासून थेट स्वातंत्र्य चौकापर्यंत वाहतूक एका बाजूने वळविण्यात आली आहे.मुळात आकावाणी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचे काम एका बाजूचे काम दोन आठवड्यांपूर्वीच पूर्ण झालेले असताना या मार्गावरुन वाहतूक सुरु का करण्यात आलेली नाही, असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे आकाशवाणी केंद्रापासून थेट स्वातंत्र्य चौक, पुढे महात्मा गांधी उद्यानापर्यंत वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे.
तीनशे मीटरसाठी अर्धातास
हा मार्ग प्रमुख वाहतुकीचा मार्ग आहे. या रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय, माहिती कार्यालय, आकाशवाणी केंद्र, गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रशासकीय इमारतीतील वनविभाग, कृषि विभाग अशी बहुतांश शासकीय कार्यालये आहेत. शिवाय नव्या बसस्थानकात येण्यासाठी हाच मार्ग असल्याने एसटी बसेसची मोठी वर्दळ याच रस्त्यावरुन असते. त्यामुळे, या रस्त्यावर सध्या वाहतुकीची प्रचंड कोंडी होतेय. या अवघ्या दोन- तीनशे मीटर अंतरासाठी वाहनधारकांना अर्धातास लागतो, अशी अवस्था आहे
.ठेकेदाराकडून सुविधा
या रस्त्याचे काम घेणाऱ्या ठेकेदार एजन्सीने वाहनधारकांसाठी दिशादर्शक फलक लावले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना किमान वाहतुकीबाबत मार्गदर्शन मिळते. मात्र, वाहतुकीच्या नियमनासाठी पोलिस दलाकडून कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत. आकाशवाणी केंद्रासह स्वातंत्र्य चौकात, निरीक्षणगृहाजवळ तसेच पुढे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यासमोर वाहतूक पोलिसांची कायमस्वरुपी नियुक्ती करणे आवश्यक आहे. पोलिस नसल्यामुळे वाहतुकीची कोंडी अधिक वाढते, अशी स्थिती आहे.