जालना (राजमुद्रा):- मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. पण ज्याला पाडायचे त्याला पाडा, असं विधानही मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष गॅसवर गेले आहेत. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यामुळे लोकसभा निवडणुकीत धाकधूक वाढलेली असतानाच जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान करून सर्वांनाच धक्का दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी थेट राजकारणात येण्याचंच सूतोवाच केलं आहे. विधानसभेच्या जागा लढवणार असल्याचं जाहीर करतानाच उद्यापासूनच विधानसभेच्या कामाला लागा, असे आदेशच मनोज जरांगे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे जरांगे यांच्यामुळे अनेकांची राजकीय खेळी उद्ध्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली
मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना मोठी घोषण केली आहे. मराठा समाज आता हुशार झाला आहे आणि लोक म्हणाले म्हणून आता काम करायचे नाही. आम्ही लोकांपर्यंत पोहचू शकत नाही आणि आणि आमच्याकडे 40 उमेदवार उभे करण्याचा डेटा नाही. काहीही करायला लागलो तर जात संपेल, समाजाची हानी होईल, असं सांगतानाच राहिलेले आरक्षण द्यायला मी खंबीर आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
करेक्ट कार्यक्रम करायचा
मराठा समाजाने कुणाच्याही प्रचाराला जायचे नाही. बारकाईने लक्ष ठेवायचे आहे. आता करेकट कार्यक्रम करायचा आहे. आम्हाला जे लागते ते द्या. मग तुम्ही उताणे पडा किंवा सरळ पडा, त्याच्याशी आम्हाला काहीही घेणंदेणं नाही. आम्हाला राजकारणाशी काही देणे घेणे नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. मी कुणाला मतदान करा म्हणणार नाही. पण जे आरक्षणाच्या बाजूने आहे त्यांनाच मतदान करायचे आहे. कुणाला पाडायचं हे आता मराठ्यांनी ठरवायचं आहे, असंही ते म्हणाले.
112 जागा लढवणार
उद्यापासून विधानसभेच्या तयारीला लागायचं आहे. आम्ही 112 पेक्षा अधिक विधानसभेच्या जागा लढवणार आहोत, अशी घोषणा करतानाच तुम्ही काहीच करत नाहीत आणि तुम्हीच आम्हाला राजकारणात ढकलत आहात. ही वेळ तुम्हीच आमच्यावर आणली आहे, असंही जरांगे यांनी म्हटलंय.
मुख्यमंत्री मनातून उतरले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आमची खूप माया होती. ते कोणत्या पक्षातून कुठे गेले याच्याशी मराठ्यांना काहीच घेणंदेणं नव्हते आणि नाही. शिंदे साहेबच आम्हाला आरक्षण देतील असं आम्ही म्हणायचो. पण ते मराठ्यांच्या मनातून उतरले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना मी सहा महिने काहीच बोललो नाही. ते गुन्हे दाखल करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.