अमळनेर(राजमुद्रा): – महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची इतर राज्यातून वाहतूक करणाऱ्या वाहनावर अमळनेर पोलिसांनी कारवाई केली असून, त्यात १७ लाख ३२ हजार रुपये किमतीचा गुटखा व इतर मुद्देमाल शुक्रवारी (ता.२९) सायंकाळी सातच्या सुमारास जळोद (ता. अमळनेर) येथून जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाळकर, पोलिस निरीक्षक विकास देवरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित सावळे यांना मध्य प्रदेशातून गुटखा वाहतूक करणारे वाहन जळोद मार्गे अमळनेरकडे जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर पोलिस कर्मचारी हितेश बेहरे, जयंत सपकाळे, गणेश पाटील. हर्षल पाटील, नीलेश मोरे, बागडे, तसेच दोन पंच यांच्यासमवेत जळोद गावाजवळील दरवाजाजवळ सापळा लावला असता शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी सातच्या सुमारास हातेडकडून अमळगावकडे जाणारी महिंद्रा पीकअप (एमएच ०१, डीआर ११०८) ही गाडी सापळा लावलेल्या पथकाने थांबविली व चालकाला विचारपूस केली असता त्याने मध्य प्रदेशातील एका शेतातून विमल गुटख्याची वाहतूक करीत असल्याची माहिती दिली.
त्यानुसार पथकाने वाहनाची तपासणी केली असता वाहनात ७ लाख ७७ हजार रुपयाचा ४ निळ्या गोणीतील विमल गुटखा, १ लाख ४२ हजार रुपयाचा पाच पांढऱ्या गोणीतील विमल गुटखा, आठ लाख रुपये किमतीची महिंद्रा पीकअप वाहन, पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण १७ लाख ३२ हजार ४८० रुपये किमतीचा मुद्देमाल जमा करण्यात आला असून. हितेश बेहरे यांच्या फिर्यादीनुसार अमळनेर पोलिसांत वाहनचालक छोटू रमेश भिल व क्लीनर सुनील आसाराम भिल (रा. हेंकळवाडी, ता. जि. धुळे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित सावळे तपास करीत आहेत.