जळगाव (राजमुद्रा) : – जळगावचे भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याआजूबाजूला असलेल्या चांडाळ चौकडीवर हल्लाबोल करत अप्रत्यक्ष गिरीश महाजनांवर हल्लाबोल केला. दरम्यान, उन्मेष पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेवर मंत्री तथा भाजप नेते गिरीश महाजन यांनी जोरदार हल्लाबोल केला. व उन्मेष पाटील यांना थेट आव्हानाच दिले आहे.
काय म्हणाले गिरीश महाजन?
उन्मेष पाटील यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले की, उन्मेष पाटील हे अल्पशा सुखासाठी दुःखात गेले आहेत. तुम्ही तुमची कबर स्वतःच खोदली आहे. तुम्ही लढा आणि जिंकून दाखवा आणि जनता ही आता दाखवेल कोण खरं आणि कोण खोटं आहे, असा टोला त्यांनी लगावला.
घाई केली, काहीही फरक पडणार नाही
उन्मेष पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये गेले असून त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पाटील यांच्या तिकिटाचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाचा होता. भाजपमध्ये आल्यावर त्यांना आमदारकी, खासदारकी आम्ही दिली होती. त्यांनी जाण्याची घाई केली. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष इथे राहिल्याने गेल्याने कोणाला काही फरक पडत नाही, असेही गिरीश महाजन म्हणाले.
ठाकरेंसारखी पाटलांनी स्वतःची कबर खोदली
गिरीश महाजन म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आपली स्वतःची कबर स्वतः खोदली आहे. महायुतीत असताना आमच्याशी गद्दारी केली. तुम्ही अल्पशा सुखासाठी दुःखात गेला आहात. तुम्ही तुमची कबर स्वतःच खोदली आहे. तुम्ही लढा आणि जिंकून दाखवा आणि जनता ही आता दाखवेल कोण खरं आणि कोण खोट आहे, असे थेट आव्हान गिरीश महाजन यांनी उन्मेष पाटील यांना दिले.
मोदी, शहांशी संबंध मग अशी अवस्था का?
एकनाथ खडसे यांच्या दिल्लीत भाजप प्रवेश झाल्याच्या बातम्यांवरही महाजन यांनी भाष्य केले. खडसे यांनी दिल्ली येथे भाजपमध्ये प्रवेश केला असून काही इंग्रजी दैनिकांमध्ये या बातम्या प्रसारित झाल्या आहेत. एकनाथ खडसे भाजपमध्ये पहिल्यांदा आल्यानंतर आमदार झाले होते. मंत्री झाले होते. एकनाथ खडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामासाठी कुठे प्रचारक नव्हते.
..तर खडसेंवर वाईट दिवस का आले?
गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे यांचे मोदींशी, अमित शहा, जेपी नड्डा यांच्याशी संबंध आहेत असे ते म्हणाले होते. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. खडसे यांचे जर मोदी शहा यांच्याशी चांगले संबंध होते तर त्यांना वाईट दिवस का आले? असा सवाल करत त्यांनी दिल्लीत प्रवेश केला याबद्दल मला काही माहीत नाही, असे महाजन म्हणाले.
पक्ष सोडल्याने ते काहीही टीका करू शकतात
देवेंद्र फडणवीस यांना चांडाळ चौकडीने घेरले आहे, असे उन्मेष पाटील म्हणाले आहेत. त्यांनी पक्ष सोडला असून ते आता काहीही टीका करू शकतात. पाटील यांचं तिकीट नाकारण्याची कारणे केंद्रीय नेतृत्वाला माहिती आहेत. मी त्यांना वेळोवेळी सांगितले होते. मी त्यांना समज दिली होती. त्यांच्याशी चर्चा केली होती.
तर त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे
ते जर आम्हाला चांडाळ चौकडी म्हणत असेल तर त्यांनी आपलं काय चुकल म्हणून आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असा सल्ला महाजन यांनी दिला. उन्मेष पाटील यांनी तिकडे जाऊन फार मोठी चूक केली आहे. आमच्याकडे त्यांना भविष्य होते. त्यांना नंतर कळेल की आपण काही चूक केली, असेही महाजन म्हणाले.