आज राष्ट्रवादीची राज्य कार्यकारणीत बैठक
रावेर राजमुद्रा | राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे भाजप प्रवेश करणार हे निश्चित झाले आहे. याबाबत स्वतः खडसे यांनी माध्यमांसमोर येऊन पंधरा दिवसाच्या आत भाजप प्रवेश करणार असे देखील सांगितले खडसेंच्या संकट काळात पक्ष प्रवेश, आमदारकी, पुत्री रोहिणी खडसे यांना महिला प्रदेशाध्यक्ष पद तरी देखील पक्षाला सोडचिठ्ठी देण्यावरून राष्ट्रवादीत अंतर्गत कलह व्हायला सुरुवात झाली आहे.
संकट काळामध्ये भाजपने डावलल्या नंतर राष्ट्रवादीत प्रवेश देऊन आमदारकी तसेच मुलीला महिला प्रदेशाध्यक्ष पक्षाने देऊ केले मात्र तरी देखील निवडणुकांच्या तोंडावर पक्ष संकटात असताना खडसे पक्ष सोडून जात असल्याचे जाहीरपणे वक्तव्य करणाऱ्या खडसेंवर पक्षशिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी पक्ष श्रेष्ठीं यांच्या केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तसेच खडसेंचे राजकिय वजन वापरून रोहिणी खडसे यांना दिलेले महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून आज मुंबई येथे आयोजीत राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये वाद रंगणार असल्याचे देखील समजते आहे. यादरम्यान काही पदाधिकारी राजीनामा देण्याच्या देखील पावित्र्यात असल्याची चर्चा आहे.
खडसे यांच्या “भाजपमध्ये जाणार” या वक्तव्यामुळे जळगाव जिल्ह्यात कार्यकर्त्यांमध्ये मोठी अनास्था पसरली आहे. त्यांचे परिणाम लोकसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यात “डॅमेज कंट्रोल” करताना नाके – नऊ येणार आहे. वर्षानुवर्ष एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना पक्षाकडून आमदारकी अथवा सत्ता असताना महामंडळ देण्यात आलेली नाही.
मात्र अवघ्या दोन वर्षांपूर्वी आलेल्या खडसेंना पक्षांमध्ये घेत त्यांना विधान परिषदेची आमदारकी, मुलीला महिला प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आले मात्र तेच खडसे आता संकट काळामध्ये पक्षाचे साथ सोडत असल्याने खडसेंना संकट काळात मदत करून काय साध्य झालं ? असं थेट सवाल पक्ष श्रेष्ठींना विचारला जाणार आहे. यामुळे राजकिय वादंग रंगणार हे निश्चित आहे.