मुंबई (राजमुद्रा) : – वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना मोठा इशारा दिला. विजय वडेट्टीवार यांनी वंचित बहुजन आघाडीला पाहिजे तेवढा हुंडा मिळत नसल्याने ते महाविकास आघाडीत आले नाहीत, असे विधान केले होते. यावर प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिलं आहे. “निवडणुकांमध्ये जागांचा समझोता होता. आपण बघू शकतो की, कालपर्यंत महाविकास आघाडीचे जागावाटप झाले नव्हते. त्यामुळे अशा लोकांनी हुंड्याची चर्चाच करू नये. आम्ही काढायला गेलो की इतर जणांना सार्वजनिक फिरायला कठीण जाईल. माझ्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट आहोत”, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
‘राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिल्याने उत्तर भारतीय असुरक्षित’
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बिहारमधील कार्यकर्ते जे मुंबईमध्ये राहतात आणि दक्षिणेतील जे कार्यकर्ते आहे, ज्यांना भाजप जवळची वाटत होती त्यांना असुरक्षित वाटू लागले आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत केला आहे. मुंबईसारख्या शहरात मनसे किंवा शिवसेना यांनी अगोदर आंदोलन उभे केले होते. ते म्हणजे लुंगी हटाव, पुंगी बजाव. त्यानंतर उत्तर भारतीयांच्या विरोधातले आंदोलन उभे केले. मनसेने धारावी या ठिकाणी छ्ट पूजेला विरोध केला आणि बिहारमधील लोकांना मारल्याची आठवणही आंबेडकर यांनी करुन दिली.
प्रकाश आंबेडकर यांचा ठाकरे आणि पवारांवर आरोप
“सांगलीचे राजकारण तापलेले असताना आंबेडकर म्हणाले की, सांगलीमध्ये शिवसेनेचे काहीच नव्हतं, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली. आज सकाळीच काँग्रेस नेते विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी माझी भेट घेतली आणि चर्चाही केली. लवकरच विशाल पाटील निर्णय घेतील”, अशी अपेक्षाही आंबेडकरांनी व्यक्त केली.
‘मुंबईच्या जागा जाणीवपूर्वक जाहीर केल्या नाहीत’
मुंबईचे उमेदवार आम्ही जाणीवपूर्वक जाहीर केले नाहीत. त्याचे कारण की, निवडणूक सुरू झाल्यानंतर मनसेचा पाठिंबा भाजपवाले घेतील. ते झालं की, मुंबईमधील पूर्ण गणित बदलते त्यासाठी आम्ही थांबलो होतो. उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही मुंबईमधील उमेदवार जाहीर करणार असल्याचेही आंबेडकर म्हणाले.