जळगाव राजमुद्रा ;- देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जळगाव शहरातील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सच्या नयनतारा या शोरुममध्ये शनिवारी सायंकाळी आयकर विभागाच्या पथकाने धडक दिली. आयकर पथकाचे अधिकारी रात्री उशिरापर्यंत चौकशी करीत होते. शोरुममध्ये स्थानिक पोलीस बंदोबस्त देखील असून कुणीही याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला.
जळगाव जिल्ह्यातील सराफ व्यापारात मोठे नाव असलेल्या राजमल लखीचंद फर्ममध्ये काही महिन्यांपूर्वी सक्त वसुली संचालनालय (र्इडी) पथकाने छापा टाकला होता. पथकाने मोठा ऐवज जप्त करीत याबाबत माध्यमांना माहिती दिली होती. सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून दुसरीकडे इडी पथकाच्या कारवाया देखील जोरात आहेत.
शनिवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास आयकर विभागाच्या जळगाव कार्यालयातील 4 अधिकाऱ्यांनी रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सच्या नयनतारा हे शोरुम गाठले. स्थानिक पोलीस ठाण्यातील 2 पुरुष आणि 2 महिला कर्मचारी सोबत घेत त्यांनी चौकशीला सुरुवात केली. रात्री 12 वाजले तरी चौकशी सुरु होती. सध्या सोन्याचे दर गगनाला भिडत असताना आयकर विभागाकडून सराफ पेढीमध्ये चौकशी सुरू करण्यात असल्याने सराफ बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, चौकशीबाबत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलणे टाळले.