मुक्ताईनगर (राजमुद्रा) -: रेल्वेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याऐवजी ॲप्रेंटिसधारकांना कामावर घ्यावे, यासाठी खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या मागणीला यश आले आणि हजारो तरुणांना हक्काची व सुरक्षित नोकरी मिळाली.
‘त्या’ तरुणांना न्याय
अनेक ॲप्रेंटिस झालेल्या तरुणांची घरची परिस्थिती गरिबीची आहे व त्यांचे वय वाढत आहे. या पार्श्वभूमीवर निवृत्त कर्मचाऱ्यांऐवजी माणुसकीच्या भूमिकेतून ॲप्रेंटिस झालेल्या तरुणांना संधी मिळावी, असा आग्रह श्रीमती खडसे यांनी धरला आणि त्यासाठी पाठपुरावा केला.
रेल्वेतील सर्व विभागातील ॲप्रेंटिस पूर्ण झालेल्या तरुणांची संख्या सुमारे २१ हजार आहे. ‘ग्रुप डी’ सुरक्षा विभागात सुमारे दीड लाख मनुष्यबळाची कमतरता आहे. ॲप्रेंटिस झालेल्या तरुणांना २० टक्के आरक्षणाच्या अटीतून सवलत मिळावी, अशी मागणी होत होती व जवळपास पाचशेहून अधिक तरुणांना त्यातून नोकरी मिळाली आहे.
या नोकरीने आयुष्य सावरल्याची भावना व्यक्त करताना ही तरुण मंडळी सद्गदीत होते. ॲप्रेंटिसधारक तरुण या नोकरीबद्दल रक्षा खडसेंबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. रेल्वेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याऐवजी ॲप्रेंटिसधारकांना कामावर घ्यावे, अशी भूमिका खासदार रक्षा खडसे यांनी गेल्या टर्ममध्ये लोकसभेत मांडली होती.
त्यासंबंधीची मागणी त्यांनी रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्विन लोहानी यांच्याकडे केली होती. गेल्या टर्मच्या काळात २६ ऑक्टोबर २०१७ ला रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहून रेल्वे ॲप्रेंटिस पूर्ण झालेल्या तरुणांना रेल्वेत संधी मिळावी, अशी मागणी केली होती.