जळगाव (राजमुद्रा) : – जळगाव लोकसभा मतदार संघात पराभव दिसत असल्यामुळे भाजपने डमी उमेदवार उभा केला.इतकेच नाही तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार देखील मॅनेज केला. शिवसेनेचे मताधिक्य कमी करण्यासाठी हा भाजपचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी केला आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेचे जळगाव लोकसभेचे उमेदवार करण पवार यांना हरविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आणि डमी उमेदवार करणसिंग संजयसिंग पवार हे भाजपची बी टीम असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात माझ्याकडे कागदोपत्री पुरावे देखील असल्याचे आयोजित पत्रकार परिषदेत संजय सावंत यांनी माहिती दिली आहे.
मग कटकारस्थान करायची गरज काय
भाजप जर ५ लाख पेक्षा अधिक मताधिक्याची घोषणा करत असेल तर त्यांना असे कटकारस्थान करायची काय गरज आहे. करण पवार नावाचा दुसरा उमेदवार त्यांना शोधायची गरज पडली. मात्र करण पवार शोधताना त्यांना करणसिंग संजयसिंग पवार नावाचा डमी उमेदवार मिळाला आहे. मात्र राजकीय दबाव वापरून त्याचे नाव करण संजय पवार घोषित करावा लागलं. वंचितला जळगावमध्ये उमेदवार सापडत नव्हता. पण हे दोन्ही उमेदवार २५ तारखेला दुपारी पावणेतीनच्या दरम्यान अर्ज दाखल करायला आले. दोघांची नोटरी सुद्धा ३८२ आणि ३८३ एमआरडी शर्मा नावाच्या एजंटकडून आहेत. ते भाजपच्या कर्मचाऱ्यांच्या चाळीसगाव कार्यालयातील आहे. हे दोन्ही उमेदवार हे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांचे सहकारी असल्याचा आरोप करत ही भाजपची बी टीम असल्याचे सावंत यांनी सांगितले.