जळगाव (राजमुद्रा) : – जिल्ह्यात लोकसभा निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी जिल्हा पोलिस दलाने आचारसंहिता लागल्यापासून मोक्का, एमपीडीएसह सुमारे ८ हजार ३३० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
पोलिस दलाने नाकाबंदीसह केलेल्या कारवाईत बेकायदा शस्त्र बाळगणे, आर्म ॲक्ट, एमडी, गुटखा.गांजा, असा एकूण सुमारे चार कोटी दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी यांनी सोमवारी (ता. २९) सायंकाळी सहाला झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणूक ऐन रंगात आली असून, मतदान शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलिस दल तयारीला लागले आहे.
आचारसंहिता लागल्यापासून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिस दल ॲक्शन मोडवर आले आहे. १६ मार्चपासून सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी, तसेच अवैध धंदेचालकांवर कारवाईचा धडाका लावला होता. आतापर्यंत जिल्हाभरात सुमारे ८ हजार ३३० जणांविरुद्ध प्रतिबंधात्क कारवाई करण्यात आली आहे.
यात नऊ जणांविरुद्ध एमपीडीएतंर्गत, तर १ गँगवर मोक्कातंर्गत कारवाई करण्यात आली. यापैकी तीन हजार २५० जणांना नोटीस बजावली असून, दोन हजार ७६४ जणांना नॉलबेलेबल वॉरंट बजावली असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी सांगितले. भुसावळ विभागाचे पोलिस उपअधीक्षक कृष्णकांत पिंगळे या वेळी उपस्थित होते.
सराईत गुन्हेगारांची रवानगी
आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत ७३८ दारुबंदीची कारवाई केली असून, १ कोटी ७ लाख रुपयांची २ लाख ६० हजार लिटर अवैध दारु जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली.
असा फौजफाटा येणार
पोलिस दलाचे : ३५०० महिला-पुरुष कर्मचारी
निरीक्षक-उपनिरीक्षक : २५०
कर्नाटक राज्य सशस्त्र पोलिस बल : १ तुकडी
केरळ राज्य सशस्त्र पोलिस बल : १ तुकडी
गृहरक्षक दलाचे कर्मचारी : ३ हजार
राज्यराखीव दलाच्या तुकड्या : २
भारतीय सेना दलाचे जवान : १ तुकडी
केंद्रीय सुरक्षाबल अर्धसैनिक बल : १ तुकडी