जळगाव, 2 मे, (राजमुद्रा) – भुसावळ शहरात एका बंद घराचे कुलूप तोडून घरातून ३ लाख ३२ हजार ५०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याची घटना शहरातील शांती नगर महिला कॉलेजजवळ उघडकीस आली आहे.
याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ शहरातील शांती नगर येथील महिला कॉलेजजवळ भगवान साहेबराव पाटील हे वास्तव्याला असून भगवान पाटील हे घर बंद करून कामाच्या निमित्ताने निघून गेले होते. त्यांचे घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकुण ३ लाख ३२ हजार ५०० रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. ते घरी आले तेव्हा घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यानंतर आत जावून पाहणी केली असता घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.