जळगाव (राजमुद्रा) :- तालुक्यातील वढोदा येथे एका घराच्या दरवाज्याला लावलेला पत्रा उचकावून चोरट्याने कपाटातील लॉकरमधील रोकड, सोन्याचे दागिने, मोबाईल, असा एकूण दोन लाख २४ हजारांचा मुद्देमाल लांबविला होता.
या चोरी प्रकरणी जिल्हा गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांच्या पथकाने दोन संशयितांना बुधवारी (ता. १) अडावद (ता. चोपडा) येथून अटक केली. त्या दोघांनी चोरीची कबुली दिली असून, बुधवारी दोघांना यावल न्यायालयाने शनिवार (ता. ४)पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. (jalgaon two arrested in Burglary at Wathoda )
वढोदा (ता. यावल) येथील प्रदीप दिनकर सपकाळे रविवारी(ता. २८) रात्री कुटुंबासह घराच्या छतावर झोपले होते. सोमवारी पहाटेपूर्वी त्यांच्या घरात चोरी झाली. त्यांच्या दरवाज्याला अडकन म्हणून लावलेला पत्रा वाकवून घरात प्रवेश करीत चोरट्यांनी कपाटाचे लॉक तोडून रोकड, सोन्याचे दागिने, मोबाईल, असा एकूण दोन लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत सोमवारी यावल पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.
पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर, जिल्हा गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे, हवालदार प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, नंदलाल पाटील, महेश महाजन, भगवान पाटील, ईश्वर पाटील, गोरखनाथ बागूल, महेश सोमवंशी, उमेश महाजन यांनी अडावद (ता. चोपडा) येथून रेवलसिंग ऊर्फ सावन गुलसिंग बारेला (रा. जामन्या, ता. भगवानपुरा, मध्य प्रदेश) व मेगसिंग ऊर्फ सेवकराम दलसिंग सोलंकी (रा. बोकरान्या, ता. भगवानपुरा, मध्य प्रदेश) या दोघांना अटक केली.
त्या दोघांनी चोरीची कबुली दिली असून, दोघांना गुरुवारी (ता. २) येथील न्यायालयात न्यायधीश व्ही. एस. डामरे यांच्यासमोर हजर केले असता, दोघांना येत्या शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे तपास करीत आहेत.