जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी नुकताच जनशक्ती प्रहार पक्षात प्रवेश केल्याने तालुक्यातील राजकारणाचे गणित बदलणार आहे. राज्याचे मंत्री ना. बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत अनिल चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांना थेट उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदाची जबाबदारी देत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष वाढी करीता कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहे यामुळे आगामी काळात अनिल चौधरी हे ऍक्शन मोड मध्ये दिसणार हे निश्चित आहे.
अनिल चौधरी हे सामाजिक राजकीय युवानेते म्हणून कार्यरत असून गेल्या निवडणुकीपूर्वी त्यांनी रावेर,सावदा, भुसावळ, फैजपूर परिसरात सामाजिक काम करून युवा कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली. अनेक तालुक्यांमध्ये त्यांनी सामाजिक कार्य केले असल्याने निवडणुकीत त्यांना या तालुक्यांमधून चांगले मताधिक्य मिळाले होते.
माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या जवळचे निकटवर्तीय म्हणून ते जिल्ह्यात सुपरिचित आहेत. परंतु त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केल्यामुळे आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ते आपली ताकद दाखविल्याशिवाय राहणार नाहीत. जळगाव जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्ष वाढीसाठी अनिल चौधरी हे प्रयत्नशील असून त्यांच्या माध्यमातून तळागाळातील कार्यकर्त्यांची मोर्चे बांधणी त्यांनी सुरु केली आहे. त्यांच्यात संघटन कौशल्य असल्यामुळे मोठा युवकवर्ग त्यांच्या पाठीशी उभा आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे इतर राजकीय पक्षातील नेत्यांचे लक्ष लागून आहे.