मुंबई : आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीत लोकसभेप्रमाणेच महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून अंतर्गत सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्वेतील निष्कर्षानुसार काँग्रेसला 85 जागा,भाजपला 55, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 55 ते 60, तर शिवसेना पक्षाला 24, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 8 ते 9 जागा,शिवसेनाउद्धव ठाकरे गटाला 32 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान विधानसभेतही काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहणार असल्याची शक्यता आहे, असा निष्कर्ष सर्वेक्षणातून आला आहे.
मागील लोकसभा निवडणुकांमध्ये (Lok Sabha Election 2024) महाविकास आघाडीने राज्यातील सत्ताधारी महायुतीला (Mahayuti) मोठा दणका देत घवघवीत यश मिळवलं होत.
मात्र आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मुंबईतील काही जागांवरून रस्सीखेच सुरु असून दोन्ही पक्षाकडून मुंबईत अधिकाधिक जागा आपल्या पक्षाने लढाव्यात असा आग्रह आहे.
या विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत 20 ते 22 जागा लढवण्यावर ठाकरें गट ठाम असताना काँग्रेसने 18 जागांचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. त्याच 18 मध्ये काही जागा ठाकरे गटाने लढविण्याची तयारी केली आहे. सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुद्धा 7 जागांचा प्रस्ताव ठेवला आहे . त्यामुळे या निवडणुकीसाठी जागा वरून महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाला समाधानकारक जागा मेरिटनुसार मिळण्यासाठी काहीशी अडचण होणार आहे.