मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे . या निवडणुकीत लोकसभेप्रमाणेच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये सामना रंगणार आहे .आता या निवडणुकांच्या जागावाटपाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी आमची राष्ट्रवादी ६० जागांवर लढणार असल्याचं म्हटलं आहे . त्यामुळे आता जागांवरून महायुतीमध्ये ठिणगी पडणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट , अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्षामध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरु असतानाच आता अजितदादांच्या राष्ट्रवादीने निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसली आहे . पक्षातील 54 आमदार यांच्यासोबतच आता या निवडणुकीसाठी काँग्रेसचे तीन शेकाप एक आणि दोन अपक्ष या 60 जणांच्या व्यतिरिक्त आणखी देखील जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे . या निवडणुकीसाठी काँग्रेसचे हिरामण खोसकर झिशान सिद्धकी आणि सुलभा खोडके लवकरच आपल्या सोबत येणार असल्याची माहिती सांगत अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, संजय मामा शिंदे आणि शेकापचे श्यामसुंदर शिंदे हे देखील आपल्या सोबत असल्याचा उल्लेख अजितदादांनी केला आहे . त्यामुळे आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीवरून जागावाटपावरून रस्सीखेच सुरु होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
या विधानसभेसाठी भाजपने 150 पेक्षा कमी जागा लढणार नसल्याची भूमिका घेतल्याने पेच निर्माण झाला असतानाच आता अजितदादांची राष्ट्रवादी ६० जागा लढणार असल्याचे विधान केलं आहे . त्यामुळे आता जागावाटपाचा तिढा सुटणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .