मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना महाराष्ट्रात सध्याची परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे . या पार्शवभूमीवरच आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचालींना वेग आल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणे, बदलापुरात झालेली घटना यामुळे सरकारच्या कार्य पद्धतीवर शंका आणि प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या नकारात्मक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .
दरम्यान आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून विविध पक्षाचे राजकीय नेते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांची पाहणी करत मतदारसंघांची चाचपणी करत आहेत. तर काही पक्षात नेत्यांचे इनकमिंग आऊटगोईंग होण्यास सुरुवात झाली आहे . आता या निवडणुकांआधीच राज्यात राष्ट्र्पती राजवट लागू होण्याच्या हालचालींना वेग आला आहे . महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लोकसभेप्रमाणे विधानसभेचा सामना रंगणार आहे . यासाठी जागावाटपाचा तिढा सुरु असतानाच आता केंद्रीय संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, महाविकासआघाडीला जवळपास 180 च्या आसपास जागा मिळतील. त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची. यानंतर काही काळ गेल्यानंतर तसेच वातावरण शांत झाल्यानंतर निवडणुकांना सामोरे जायचे, अशा हालचाली सध्या सुरु असल्याची माहिती काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे . मात्र दुसरीकडे विधानसभा निवडणुकांची तारीखही अद्याप जाहीर झालेली नाही .
तर दुसरीकडे महायुतीमध्ये काही सुरळीत नसल्याचे दिसून येत आहे .महायुतीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष आहेत. परंतु अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत झालेली युती शिवसेना अन् भाजपच्या कार्यकर्त्यांना पटलेली नाही. त्यामुळॆ ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुतीत जागावाटपावरून ठिणगी पडणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .