राजमुद्रा : आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्शवभूमीवर कोल्हापुरात राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे . राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा कोल्हापूर जिल्हा दौऱ्याचा आज पहिलाच दिवस असून त्यांनी मोठी खेळी खेळली आहे . अजित पवार यांची साथ सोडलेले के.पी.पाटील आणि ए.वाय पाटील या मेहुण्या-पाहुण्यांनी पवारांची भेट घेतली. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या एका बड्या नेत्यानं पवारांची भेट घेतली. समरजीत घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले राहुल देसाई सुद्धा भाजपला रामराम करून तुतारी हाती घेणार असल्याची माहिती समोर आली आहे .
माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव आणि भाजच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले राहुल देसाई यांनी आज शरद पवारांची भेट घेतली आहे . ते राधानगरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत . त्यांनी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे . त्यामुळे आता भाजपला रामराम करून ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या वाटेवर जाणार असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे .
राधानगरीची उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी दोन्ही नेत्यांशी सविस्तर चर्चा केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. घाटगेनंतर देसाई हे शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. राधानगरी विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे के पी पाटील, ए वाय पाटील यांच्यानंतर आता राहुल देसाई हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आल्या असताना आता भाजपला मोठा धक्का बसणार आहे . आज सकाळी माजी आमदार के.पी पाटीलआणि त्याचे मेहुणे ए. वाय. पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. दोन्हीही ‘मेहुणे-पाहुणे’ राधानगरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. आघाडीकडून उमेदवारी मिळण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. त्यामुळं आता या नेत्यांना महाविकास आघाडीत उमेदवारी मिळते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .