राजमुद्रा : गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी बोगस अर्ज करणाऱ्यांवर आता कडक कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे या योजनेतून पैसे लाटण्याच्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी सरकारने जोरदार कंबर कसली असून बोगस अर्ज आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे लाटण्याच्या प्रकारानंतर महिला आणि बालविकास विभाग आता खडबडून जागे झाले आहे. यापुढे अर्जांची सखोल छाननी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
लाडकी बहीण योजनेत काही पुरुषांनी अर्ज केल्याची माहिती समोर आली असून त्यातील एकाच्या तर खात्यात 78 हजार रुपयांच्या घरात हप्ता सुद्धा जमा झाल्याचा प्रकार उघड झाला. त्यामुळे आता राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे ज्यांनी या योजनेसाठी काही कारनामे केले असतील तर ते उघड होण्याची शक्यता आहे. तर बोगस अर्ज आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा ही देण्यात आला आहे.
अकोल्यासह साताऱ्यातही एका पुरुषाने या योजनेत जवळपास 30 अर्ज महिला म्हणून जमा केले. त्यासाठी त्याने महिलेच्या वेशात विविध छायाचित्र काढले. काही महिलांचे आधार कार्ड मिळवून त्या आधारे त्याने या योजनेत 30 अर्ज दाखल केले. त्यामुळे या योजनेत पैसे लाटणाऱ्यावर आता लवकरच कारवाई करण्याचा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना सरकारने दिला आहे.