राजमुद्रा : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत.तसेच दोनच दिवसावर असलेला गणेशोत्सव या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने 6 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये मुंबई व पुणे शहरातील काही महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.त्यामध्ये तेजस्वी सातपुते यांना पुण्यात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. तेजस्वी सातपुते यांची पुणे शहर पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. सध्या त्यांच्याकडे बृहन्मुंबईचे पोलीस उपआयुक्त पदाचा पदभार होता.त्यानंतर संदीप सिंह गिल्ल, पंकज देशमुख, राजतिलक रोशन, निमित्त गोयल आणि विजय चव्हाण यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी व पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी लाखो भाविक राज्यभरातून येत असतात. त्याशिवाय पुण्यातील गणेशोत्सव राज्यभर प्रसिद्ध असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक दर्शनासाठी येतात. त्या अनुषंगाने गुरुवारी सायंकाळी राज्याच्या गृह विभागाकडून मुंबई आणि पुण्यातील काही महत्त्वाच्या आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
तसेच गेल्या काही दिवसांत पुण्यात झालेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवरही गृह विभागाने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (Transfer) केल्या आहेत. त्यामध्ये संदीप सिंह गिल्ल यांच्याकडे पुणे ग्रामीणच्या अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या त्यांच्याकडे पुणे शहर उपायुक्त पदाचा पदभार आहे.